ओटीटीवर प्रदर्शित होऊनही थिएटर गाजवतोय हेमंत ढोमेचा 'फसक्लास दाभाडे' सिनेमा, प्रेक्षकांची मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 14:05 IST2025-03-14T13:35:26+5:302025-03-14T14:05:27+5:30
ओटीटीवर चित्रपट उत्तमरित्या चालत असतानाही अनेक प्रेक्षक आजही हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहणं पसंत करत आहेत.

ओटीटीवर प्रदर्शित होऊनही थिएटर गाजवतोय हेमंत ढोमेचा 'फसक्लास दाभाडे' सिनेमा, प्रेक्षकांची मिळतेय पसंती
हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' हा सिनेमा २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. केवळ महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापारही या सिनेमाला प्रेक्षकांचे प्रेम मिळालं. युएई-जीसीसी प्रदेश, युके येथे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तो त्या भागात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. स्पेन मधे तर फसक्लास दाभाडेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमा रिलीज झाला. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट अमेझॉन प्राईमवरही प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यात संपूर्ण भारतात बघितल्या जाणाऱ्या पहिल्या तीन चित्रपटांमधे जाऊन पोहोचला. पण, ओटीटीवर चित्रपट उत्तमरित्या चालत असतानाही अनेक प्रेक्षक आजही हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहणं पसंत करत आहेत. त्यामुळेच आज हा चित्रपट सिनेमागृहात यशस्वी अर्धशतक साजरे करत आहे. गेले ५० दिवस हा सिनेमा यशस्वीरित्या थिएटर गाजवत आहे.
इरसाल भावंडांची स्टोरी असणाऱ्या या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित 'फसक्लास दाभाडे'चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. कुटुंबातील नातेसंबंध, सामाजिक संदर्भ, मजेशीर संवाद आणि प्रसंग या सगळ्यामुळे 'फसक्लास दाभाडे' हा एक परिपूर्ण कौटुंबिक चित्रपट ठरला आहे.
चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' खूप आनंद वाटतोय की आपल्या मातीतला 'फसक्लास दाभाडे' चित्रपटगृहात सलग पन्नास दिवस पूर्ण करतोय आणि ओटीटी वर देखील अव्वल ठरतोय. मुळात ही कथा तुमच्या आमच्या घरातली असल्याने ती प्रेक्षकांना विशेष भावतेय. प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया ये आहेत आणि त्यामुळेच असेच नवनवीन विषय प्रेक्षकांपुढे आणण्याची उर्जा देखिल मिळते. झिम्मा, झिम्मा २ नंतर फसक्लास दाभाडे देखील चित्रपटगृहात ५० दिवस पुर्ण करतोय. आजवर मराठी प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.''