"एकतर प्रचंड प्रेम, नाहीतर डायरेक्ट गेम...! बहुचर्चित 'हार्दिक शुभेच्छा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:17 IST2025-02-28T12:15:21+5:302025-02-28T12:17:08+5:30
दमदार कलाकारांची मांदियाळी असलेल्या 'हार्दिक शुभेच्छा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

"एकतर प्रचंड प्रेम, नाहीतर डायरेक्ट गेम...! बहुचर्चित 'हार्दिक शुभेच्छा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Hardik Shubhechha Movie Trailer: दमदार कलाकारांची मांदियाळी असलेल्या 'हार्दिक शुभेच्छा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. येत्या २१ मार्च २०२५ ला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
दरम्यान, 'हार्दिक शुभेच्छा' चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट लग्नसंस्था आणि त्यानंतरच्या प्रवासावर आधारित असल्याचे दिसतेय. ट्रेलरमध्ये पुष्कर लग्नासाठी मुली बघत असून त्याच्या आयुष्यात हेमल इंगळे आणि पूर्वी मुंदडा आल्याचे दिसत आहेत. सोबतच त्यांच्या नात्यात काही गुंतागुंतीचे प्रसंगही दिसत आहेत. त्यामुळे पुष्करच्या आयुष्यात नेमकं कोण येणार? त्यांचे वैवाहिक जीवन कसे असणार? पण, त्याचं काय’ हा नेमका काय प्रश्न? तो सुटणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या २१ मार्चला मिळणार आहेत.
ट्रेलरमध्ये पुष्कर नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे तर हेमल आणि पूर्वीही जबरदस्त दिसत आहेत. पुष्करचे चित्रपटांमध्ये नेहमीच भव्यता असते. कथानकात वेगळेपण असतेच याशिवाय तो चित्रीकरणस्थळांमध्येही वैविध्य घेऊन येत असतो. या चित्रपटात प्रेक्षकांना ॲमस्टरडॅम, पॅरिस आणि दुबईची सैरही घडणार आहे. पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा यांच्यासह या चित्रपटात विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्वीक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.