"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 10:44 IST2025-11-24T10:43:24+5:302025-11-24T10:44:28+5:30
"मी छान कार्यक्रम करुन बाहेर पडते पण नेहमीच...", गौतमी पाटीलने व्यक्त केली खंत

"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन
लोकप्रिय नृत्यांगनागौतमी पाटील गावागावात जाऊन लावणी नृत्याचे कार्यक्रम सादर करते. गौतमीला या कार्यक्रमांमधून कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. गावागावातील तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. मात्र या गर्दीत लोक गोंधळ घालतात, राडा करतात अशा दरवेळी बातम्या येतात. अनेकदा गौतमीला ट्रोलही केलं जातं. नुकतंच वर्धा येथे झालेल्या कार्यक्रमाला असाच राडा झाला. यावर आता गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटील म्हणाली, "माझी कायमच एक खंत असते. मी एवढा छान कार्यक्रम करुन बाहेर पडते आणि नेहमी मला ट्रोल केलं जातं. गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाला सांगितलं जातं. कार्यक्रमाला एवढी गर्दी असते काही लोक चांगले असतात तर काही कसे असतात हे आपण सांगू शकत नाही. आमचं या कार्यक्रमावरच पोटपाणी आहे. मी सगळ्यांना विनंती करते की यावरुन मला ट्रोल करणं बंद करा. कार्यक्रम मस्त झाला सगळं छान झालं तरी असं म्हटलं गेलं."
ती पुढे म्हणाली,"प्रेक्षकांना एकच आवाहन करते की तुम्ही कार्यक्रमाला येता, एन्जॉय करता, कला बघायला येता तर थोडं शांततेत कार्यक्रम बघा. गडबड, गोंधळ करायचा असेल तर असं करु नका नाहीतर येऊ नका. कृपया कार्यक्रमाला आला आहात तर व्यवस्थित कार्यक्रम पार पडू द्या."
गौतमी पाटील गेल्या काही काळात मराठी सिनेमांमध्येही दिसली. 'घुंगरु' हा तिचा सिनेमा रिलीज झाला होता. अमेय वाघ,अमृता खानविलकरच्या 'लाईक आणि सबस्क्राईब' सिनेमात गौतमीचं आयटम साँग होतं. तसंच आगामी 'आंबट शौकीन' सिनेमातही तिचं गाणं बघायला मिळणार आहे.