'फसक्लास' सिनेमा थिएटरमध्ये पाहिलाच नाही? मग आता घरबसल्या पाहा; 'या' ओटीटीवर उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:08 IST2025-02-14T16:08:03+5:302025-02-14T16:08:43+5:30
फॅमिली एंटरटेनर असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र ज्यांना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहता आलेला नाही त्यांना आता घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे.

'फसक्लास' सिनेमा थिएटरमध्ये पाहिलाच नाही? मग आता घरबसल्या पाहा; 'या' ओटीटीवर उपलब्ध
हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि क्षिती जोग (Kshiti Jog) या लोकप्रिय मराठमोळ्या जोडीचा नवा सिनेमा 'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade) काही दिवसांपूर्वीच थिएटरमध्ये रिलीज झाला. हेमंतने सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून क्षिती जोगने निर्मिती आणि अभिनय केला आहे. तसंच सिद्धार्थ चांदेकर, मिताली वाघ, राजसी भावे, हरीष दुधाणे, निवेदिता सराफ अशी तगडी स्टारकास्ट होती. फॅमिली एंटरटेनर असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र ज्यांना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहता आलेला नाही त्यांना आता घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.
'फसक्लास दाभाडे' सिनेमाच्या मेकर्सने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. ते लिहितात, "फसक्लास दाभाडे या सिनेमावर तुम्ही भरभरून प्रेम केलंत. महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, परदेशातही प्रेक्षकांनी आपला चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहिला…पण ज्या प्रेक्षकांना आपला फसक्लास सिनेमा चित्रपटगृहात पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी!
प्राईम व्हिडिओवर आता तुम्ही आपला चित्रपट रेंट करून पाहू शकता तेही घर बसल्या! चला तर मग आता एकत्र यावंच लागतंय!"
'फसक्लास दाभाडे' सिनेमाची गोष्ट अगदी हलकीफुलकी आहे.दाभाडे कुटुंबात लग्नकार्य आहे. सगळ्या घरात असते तसे नातेवाईकांचे रुसवे फुगवे, भांडणं आहेत. मात्र लेखकाने सिनेमातून बरेच सामाजिक संदेशही सुंदररित्या मांडले आहेत. त्यामुळे सिनेमा मराठी कुटुंबाला लगेच आपलंसं करुन घेणारा आहे. सध्या सिनेमा अमेझॉनवर रेंटने उपलब्ध झाला आहे.