मराठी चित्रपटसृष्टीतील फोटोग्राफर सुधाकर मुणगेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 19:09 IST2021-05-08T19:08:55+5:302021-05-08T19:09:18+5:30

सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले.

Famous Marathi Film Industry photographer Sudhakar Munagekar passed away | मराठी चित्रपटसृष्टीतील फोटोग्राफर सुधाकर मुणगेकर यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील फोटोग्राफर सुधाकर मुणगेकर यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे नुकतेच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. अविवाहित होते. अनेक वर्षे ते एकटेच राहत होते. दामोदर कामत स्थापन केलेल्या 'कामत फोटो फ्लॅश' या कंपनीमध्ये १९६६ साली वयाच्या १८व्या वर्षी ते फोटोग्राफर म्हणून रुजू झाले. वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून काम करीत होते.


सुधाकर मुणगेकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक चित्रपटांचे स्थिरचित्रण केले होते. तसेच राज कपूर यांच्या आरके बॅनर निर्मित 'मेरा नाम जोकर', 'बॉबी', 'सत्यम शिवम सुंदरम', 'प्रेम रोग', 'धरम करम', 'हिना' तसेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या 'अखियोंके झरोखेसें', 'नादिया के पार', 'सारांश', 'उपहार', 'गीत गाता चल', 'चितचोर', 'मैने प्यार किया', एन. चंद्रा यांच्या 'नरसिंहा'सह जवळपास दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचे काम केले आहे. 

मराठीमध्ये दामू केंकरे दिग्दर्शीत 'सखी माझी', कुमार सोहनी दिग्दर्शित  'जोडीदार', 'तुझ्याचसाठी' अश्या अनेक मराठी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिकांसाठी स्थिरचित्रण केले आहे. राज कपूर साहेब, देव आनंद, राजश्री प्रॉडक्शन्सचे बडजात्या, अभिनेत्री नर्गिस, मधुबाला, दिग्दर्शिका सई परांजपे, दामू केंकरे, एन. चंद्रा, श्रीकांत ठाकरे, कुमार सोहनी, सुभाष फडके अश्या अनेक दिग्गजांसोबत सुधाकर मुणगेकर यांनी काम केले होते. मितभाषी असलेल्या सुधाकर मुणगेकर यांचे भगवान दादासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी स्नेहपूर्ण संबंध होते. कन्टीन्यूटी फोटोग्राफीमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते.

Web Title: Famous Marathi Film Industry photographer Sudhakar Munagekar passed away