आदर्श शिंदेच्या आवाजात 'एन्जॉय एन्जॉय'! तुम्ही ऐकलत का हे धमाल गाणं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 14:19 IST2024-01-12T14:15:28+5:302024-01-12T14:19:06+5:30
अभिनेता शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात पाहायला मिळत आहेत.

आदर्श शिंदेच्या आवाजात 'एन्जॉय एन्जॉय'! तुम्ही ऐकलत का हे धमाल गाणं?
लोकप्रिय गायक आदर्श शिंदे याने आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' या सिनेमातील आदर्श शिंदेचं 'एन्जॉय एन्जॉय' हे धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आदर्श शिंदेच्या दमदार आवाजातील प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. अभिनेता शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात पाहायला मिळत आहेत.
'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' चित्रपटातील हे गाणे गणेश निगडे यांनी लिहलं आहे. तर आदर्श शिंदे आणि सुहित अभ्यंकर यांनी हे गाणं गायलं आहे. आनंद शिंदे यांचा मुलगा आदर्श शिंदे हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक आहे. आदर्श शिंदेने आजवर मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमधील 1500 हून अधिक गाणी गायली आहेत.
'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. यात अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने अशी उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.
या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसतं. तर वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाने पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी या चित्रपटाची निर्माती केली. तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.