लवकरच प्रेक्षकांच्या 'डोक्याला शॉट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 08:00 IST2018-11-26T08:00:00+5:302018-11-26T08:00:00+5:30
उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांची निर्मिती असलेला 'डोक्याला शॉट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या 'डोक्याला शॉट'
'बालक पालक' आणि 'येल्लो' सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन' आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांची निर्मिती असलेला 'डोक्याला शॉट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे शिवकुमार पार्थसारथी प्रथमच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत, तर सुमन साहू यांनी हा चित्रपट चित्रित केला आहे.
सोशल मीडियावर नुकत्याच झळकलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या कलरफूल लूकमध्ये सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, रोहित हळदीकर, गणेश पंडित आणि ओमकार गोवर्धन हे अतरंगी कलाकार दिसत आहेत. चित्रपटातील इतर पात्रही लवकरच आपल्या समोर येतील. या चित्रपटाच्या नावावरूनच या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार असे वाटते आहे. त्यामुळे आता हे कलाकार प्रेक्षकांच्या डोक्याला काय शॉट देणार आहेत, हे लवकरच कळेल. या चित्रपटाच्या कथानकाबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. मात्र या सिनेमाच्या निमित्ताने प्राजक्ता माळी व सुव्रत जोशी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.
अभिनेता सुव्रत जोशीने नुकताच इन्स्टाग्रामवर एका फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत सुव्रतने लिहिले होते की, डोक्याला शॉट मधल्या एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी दोन दिवस वसईमध्ये आहे आणि इथे डोक्याला शांती मिळते आहे. वसई किती सुंदर आहे! शांत, रम्य, समृद्ध आणि बहुसांस्कृतिक! कुठल्याही रस्त्यावर दोन मिनिटे चाललो तरी गोव्यात आल्यासारखे वाटते. मुंबईपासून इतके जवळ असूनही मुंबईच्या बचबचीतून अलिप्त राहिलोय असे वाटते.