"आपली कला, परंपरा अन्...",'दशावतार'ची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:22 IST2026-01-09T12:14:10+5:302026-01-09T12:22:17+5:30
"अत्यंत अभिमानास्पद...", 'दशावतार'ची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेने व्यक्त केल्या भावना,शेअर केली पोस्ट

"आपली कला, परंपरा अन्...",'दशावतार'ची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची पोस्ट, म्हणाली...
Sonali Bendre Post For Dashavtar: कोकणच्या मातीतील कला आणि संस्कृतीचा वारसा सांगणारा दशावतार हा सिनेमा २०२५ मधील मराठीतील रेकॉर्डब्रेक कमाई करणारा चित्रपट ठरला. तिकिटबारीवर लक्षवेधी कमाई करणारा सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार मध्ये दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या बाबुली मेस्त्रीच्या भूमिकेचं सुद्धा सर्वांनी तोंडभरुन कौतुक केलं. आता या सिनेमाने थेट ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत धडक दिली आहे. त्यामुळे केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेरसिकांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. आता याबाबत बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला आहे. तसंच दिग्दर्शक सुबोध खानोलकरचं कौतुकही केलं आहे.
#Dashavatar is a special moment for Marathi cinema. A film rooted in our culture and brought to life so beautifully by #DilipPrabhavalkar ji. Congratulations to #SubodhKhanolkar and the team for making it to the Oscars contention list. A proud milestone! pic.twitter.com/Y6AOyOaXyW
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) January 8, 2026
९८ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेत या दशावतार चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे. जगभरातील हजारो चित्रपटांतून निवडल्या गेलेल्या १५० चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दल अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत त्यामध्ये लिहिलंय," हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि खास असा क्षण आहे. आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणारी आणि दिलीप प्रभावळकरजींनी अत्यंत मनापासून व संवेदनशीलतेने साकारलेली भूमिका असलेला हा चित्रपट आता जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहे.अशा आशयघन कथा पाहिल्या जाणे अत्यावश्यक आहे आणि त्यांना योग्य ते कौतुक मिळायलाच हवे. तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल, तर तो आवर्जून बघा. आपली कला,परंपरा आणि प्रतिभेची सुंदर आठवण करून देणारी ही एक हृदयस्पर्शी गोष्ट आहे."
त्यानंतर सोनाली बेद्रेंने सुबोध खानोलकरला शुभेच्छा देत म्हटलंय,"दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन.ऑस्करच्या स्पर्धेत स्थान मिळवणं हा एक अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे."अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
'दशावतार' या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर, रवी काळे आणि विजय केंकरे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सिनेमात मोलाचे योगदान दिले आहे. या सिनेमाने जवळपास २८ कोटींची दणदणीत कमाई केली असून मराठीसोबतच तो मल्याळम भाषेतही प्रदर्शित झाला होता.