'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'च्या निमित्ताने दिग्पाल लांजेकरांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; म्हणाले-"परतताना मनात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:57 IST2025-04-01T09:53:11+5:302025-04-01T09:57:03+5:30

दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा सिनेमा येत्या १८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

digpal lanjekar meet yogi adityanath on the occasion of the film sant dnyaneshwaranchi muktai shared post | 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'च्या निमित्ताने दिग्पाल लांजेकरांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; म्हणाले-"परतताना मनात..."

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'च्या निमित्ताने दिग्पाल लांजेकरांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; म्हणाले-"परतताना मनात..."

Digpal Lanjekar Post: दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा सिनेमा येत्या १८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. संत ज्ञानेश्वर,निवृत्तीनाथ,सोपान आणि मुक्ताबाई या भावंडांची दिव्यगाथा 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमातून बघायला मिळणार आहे. याचनिमित्ताने मराठी दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा अविस्मरणीय किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 


नुकतीच दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "दि. ३० मार्च २०२५ , आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांचा दूरध्वनी आला. योगींना भेटायचे आहे. म्हटले “सांगा कुठे येऊ ?” ते म्हणाले “योगी म्हणजे मी नव्हे ! योगी आदित्यनाथ , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री .” मी तातडीने होकार भरला आणि अजय दादा (पुरकर) ला सोबत घेऊन लखनौला पोचलो. दि. ३१ ची सकाळी ११. १५ ची भेटीची वेळ मिळाली होती. आणि केवळ ५ मिनिटासाठी मिळाली होती. अनेक विचार डोक्यात घेऊन लखनौच्या मुख्यमंत्री आवासात पोचलो. आणि गेल्या गेल्या कळले कि दिवसाभरातली आमचीच पहिली भेट आहे."

यानंतर पुढे त्यांनी लिहिलंय, काही काळ निरंजन नाथांशी अन्य विषयावर बोलणे झाल्यावर माझ्याकडे योगी आदित्यनाथांनी सहज हसून पाहिले आणि चौकशी केली. ज्ञानोबारायांचे स्मरण करून त्यांना “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” सिनेमा बद्दल सांगायला सुरुवात केली. पोस्टर पुढे करत म्हणालो “ आता महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सिनेमा बनवत आहे. संत ज्ञानेश्वरांची ... “ इतक्यात समोरून ते उदगारले “ मुक्ताई !... अर्थात उनकी छोटी मातृतुल्य बहन!” मी आणि अजय दादाने विस्मयाने एकामेकाकडे पाहिले. तोवर “आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा...” हि ओवी त्यांनी आम्हाला ऐकवली आणि म्हणाले कि “इतिहासाशी प्रतारणा न करता हे सगळं दाखवायची इच्छा आणि प्रामाणिकपणा पाहिजे” त्यावर जरा धीर करून मी म्हटलं कि “एक कच्चा ट्रेलर आम्ही सोबत आणला आहे. अनुमती असेल तर दाखवतो.” त्यांनी क्षणाचाही विलंब ना करता दाखवा म्हटलं. अतिशय श्रद्धेनं त्यांनी ट्रेलर पूर्ण पाहिला. 

योगी आदित्यनाथ काय म्हणाले? 

"चित्रपटातील ज्ञानेश्वर माउली मुक्ताबाईंना कुंडलिनी अभ्यास शिकवतात, मुक्ताई मातेचे अध्यात्मातील अधिकार दाखवणारे प्रसंग, नाथसंप्रदायाचा इतिहास अशा प्रसंगांवर वर दाद दिली . त्यानंतर ज्या नाथ संप्रदायाचे ते पाईक आहेत , तो नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा अलौकिक संबंध , त्या सगळ्या क्रांतीत या चारही भावंडांचं योगदान यावर भरभरून बोलले. समोर बसलेली व्यक्ती एक अभ्यासू साधक आहे , हे क्षणाक्षणाला जाणवत होतं. भेटीअंती आवर्जून म्हणाले “यह निर्मिती तो अत्यन्त सुंदर हुई है... इसी तरह से धर्म और भारतीय तत्वज्ञान के प्रति प्रामाणिकता से कार्य करते रहो. इस प्रकार संतों के कार्य दिखाने वाली और भी फिल्मे बनाइये । आपका कल्याण हो।” परतताना मनात केवळ हेच येत होत “सगळं माऊलींचं आहे, मुक्ताईचं आहे… माझे केवळ पाईकपण 🙏🏻” ।।राम कृष्ण हरी ।।..."

दरम्यान, 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'या सिनेमात ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत  समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत शवेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा  चित्रपटात भूमिका आहेत. 

Web Title: digpal lanjekar meet yogi adityanath on the occasion of the film sant dnyaneshwaranchi muktai shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.