बायोपिक नव्हे तर अभंगाची गाथा; 'अभंग तुकाराम' सिनेमाच्या टीमशी दिलखुलास गप्पा
By कोमल खांबे | Updated: November 6, 2025 17:14 IST2025-11-06T17:14:14+5:302025-11-06T17:14:36+5:30
'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या सिनेमानंतर दिग्पाल लांजेकर 'अभंग तुकाराम' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमातून संत तुकारामांच्या अभंगांची गाथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी 'अभंग तुकाराम' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने सिनेमाच्या टीमने 'लोकमत'शी साधलेला खास संवाद.

बायोपिक नव्हे तर अभंगाची गाथा; 'अभंग तुकाराम' सिनेमाच्या टीमशी दिलखुलास गप्पा
>>कोमल खांबे
'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या सिनेमानंतरदिग्पाल लांजेकर 'अभंग तुकाराम' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमातून संत तुकारामांच्या अभंगांची गाथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी 'अभंग तुकाराम' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने सिनेमाच्या टीमने 'लोकमत'शी साधलेला खास संवाद.
'अभंग तुकाराम' सिनेमाचे वेगळेपण काय आहे? सिनेमा बनवताना दडपण होते का?
दिग्पाल लांजेकर : सिनेमाच्या नावातच त्याचे वेगळेपण आहे. सिनेमाचे नाव संत तुकाराम किंवा तुकाराम महाराजांची कथा असे नाहीये. 'अभंग तुकाराम : कथा संत तुकारामांच्या गाथेची' या सिनेमाच्या नावातच कथेचा विषय आहे. संत तुकारामांचे साहित्य, त्यांचे विचार, अभंग आणि तत्वज्ञान यावर हा सिनेमा भाष्य करतो. त्यांच्या विचारात खूप मोठी शक्ती आहे. या सिनेमातून संत तुकारामांचा एक वेगळा पैलू मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. संत तुकाराम महाराजांवर याआधी सिनेमे आले आहेत. पण, जे सिनेमे आले ते संत तुकारामांचे बायोपिक होते. त्यामुळे हा सिनेमा बनवताना दडपण नव्हते. कारण, आम्ही या चित्रपटातून त्यांचे विचार, जगणं हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा विषय वेगळा असल्याने आधीच्य़ा सिनेमांशी तुलना होईल असे वाटले नाही.
या सिनेमात संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारण्यासोबतच तुम्ही संवादलेखन आणि कथा लिहिली आहे, हा अनुभव कसा होता?
योगेश सोमण : संत तुकाराम महाराजांची भूमिका मी नट म्हणून केलेली नाही. मी याच्याकडे साधना म्हणून पाहतो. मी याआधी 'आनंद डोह' नाटकात तुकाराम महाराजांची भूमिका साकारली. तेव्हा मला अनेक अनुभव आले. तेव्हा मला माझ्या सद्गुरुंनी सांगितले की ही तुझ्या अध्यात्माची पुढची पायरी आहे. मी सिनेमातही त्याच पद्धतीने काम केले. संवादलेखन आणि कथा लिहिण्याच्या अनुभवाबद्दल सांगायचे झाले तर सिनेमाची कथा आणि पटकथेवरुन मतभेद होऊ शकतात. दोन लेखक एकाच सिनेमावर काम करतात म्हणजे एका म्यानात दोन तलवारी. चित्रीकरण सुरू व्हायच्या तीन-चार दिवस आधी दिग्पालने मला पटकथा पाठवली. मला त्यात काही बदल करावेसे वाटले नाहीत, इतरी ती सुव्यवस्थित होती. त्यामुळे यावरुन मतभेद झाले नाहीत.
या सिनेमात तू संत तुकाराम यांच्या पत्नी अवलीबाईंची भूमिका साकारत आहेस, काय सांगशील?
स्मिता शेवाळे : या सिनेमात मी अवलीबाईंची भूमिका साकारत आहे. अवलीबाई या फक्त संत पत्नी नव्हत्या तर त्यांना वास्तवाची जाणीव होती. मुळात आत्तापर्यंत अवलीबाईंची फक्त एकच बाजू दाखवली गेली आहे. 'अभंग तुकाराम' सिनेमात अवलीबाई तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दिसतील. तुकोबाराया होण्यासाठी अवलीबाईंचा किती त्याग होता तो तुम्हाला दिसेल. ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने लिहिली गेली होती. त्यामुळे ती साकारणे हे एक आव्हान होते.
'अभंग तुकाराम' सिनेमातील गाण्यांमध्ये काय वेगळेपण दिसणार आहे?
अवधूत गांधी : 'अभंग तुकाराम' सिनेमातील गाण्यांमध्ये संत तुकारामांनी केलेल्या अभंगांचा भाव उतरला आहे. या सिनेमातील गाण्यांचे वेगळेपण म्हणजे वारकरी गायिकेची वैशिष्ट्ये त्यातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तुकोबारायाचं १० अभंग या सिनेमातून गाण्याच्या रुपात दिसणार आहेत. तसेच ४६ अभंगांना सिनेमात स्पर्श केला गेला आहे. लोकांना त्यांनाही गुणगुणता येईल असे आवडते. या सिनेमातील गाणीही तशाच पद्धतीची आहेत.
या सिनेमात जिजाऊंची कोणती वेगळी बाजू पाहायला मिळेल?
मृणाल कुलकर्णी : 'अभंग तुकाराम' सिनेमात माझे खरे तर दोनच सीन आहेत. यामध्ये जिजाऊ आणि अवलीबाई यांचा एकत्र सीन दाखवण्यात आला आहे. दैवी पुरुषांना सांभाळणारी एक स्त्री त्यांच्या आयुष्यात असते. अशा दोन स्त्रिया या सिनेमात एकमेकींशी संवाद साधताना दिसणार आहेत. हा सिनेमा संत तुकाराम महाराजांचे अभंग, कलाकारांचे काम आणि संगीतासाठी पाहिला पाहिजे.