"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:24 IST2025-12-15T13:23:57+5:302025-12-15T13:24:59+5:30
मराठी अभिनेता योगेश सोमण यांनीही 'धुरंधर' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी व्हिडीओ शेअर करत परखड मत मांडलं आहे.

"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
सध्या जिकडेतिकडे रणवीर सिंगच्या 'धुरंधर'ची चर्चा सुरू आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' सिनेमाने अख्खं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. पाकिस्तानात राहून त्यांच्या कुरघोड्यांची माहिती पुरवणाऱ्या भारतीय गुप्तहेरांच्या कामगिरीवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाचं कथानक आणि त्यातील कलाकारांचंही सर्वत्र कौतुक होत आहे. मराठी अभिनेता योगेश सोमण यांनीही 'धुरंधर' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी व्हिडीओ शेअर करत परखड मत मांडलं आहे.
"मी नुकताच धुरंधर सिनेमा पाहिला. चित्रपटाचं कथानक हे संपूर्ण काल्पनिक आहे. तरीही ते ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन वाटावं असं तांत्रिकदृष्ट्या बांधलेलं कथानक आहे. सिनेमाची कथा आयसी ८१४ या विमान अपहरणापासून सुरू होते. त्यानंतर संसदेवरचा हल्लापासून ते २६/११चा मुंबईवरचा हल्ला इथपर्यंत ते कथानक येतं. त्यामध्ये ५००-१००० खोट्या नोटा पाकिस्तानमध्ये छापल्या जातात याचा उल्लेख होते. आणि यातूनच 'धुरंधर'चं कथानक पुढे सरकत जातं. जे की संपूर्ण काल्पनिक आहे तरीही सत्य वाटतं. सिनेमाचं सौंदर्य स्थळ जर कुठलं असेल तर मला असं वाटतं की आदित्य धर यांची पूर्ण, सुंदर, छान तर्काच्या आधारावर बांधलेली पटकथा आणि त्याचं दिग्दर्शन", असं योगेश सोमण यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.
योगेश सोमण यांनी रणवीर सिंगच्या अभिनयाचंही कौतुक केलं आहे. ते म्हणाले, "बाकी कलाकारांनी त्यांच्या भूमिका उत्तम केलेल्याच आहेत. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला जो नट अजिबात आवडत नाही. किंवा तो एक उथळ नट आहे असं मला वाटतं. विशेषत: इफ्तीच्या सांगता समारंभात त्याने जे विदुषकी चाळे केले त्यामुळे मला रणवीर सिंग अजिबात आवडत नाही. पण, आश्चर्यकारकरित्या सगळ्या कलाकारांमध्ये त्याने खूप उजवी भूमिका केली आहे. कारण, त्याला फारशा उड्या वगैरे मारुन दिलेल्या नाहीत. शांतपणे तो त्याचं ऑपरेशन करत राहतो".
"हा चित्रपट सर्वाथाने चांगला आहे. यातील हिंसा आवश्यक आहे असं वाटतं, ती अनावश्यक वाटत नाही. असे सिनेमे आले पाहिजेत आणि बघितलेही गेले पाहिजेत. काश्मीरमधले अतिरेकी हे वाट चुकलेले अतिरेकी आहेत. आणि सैन्याने त्यांच्यावर केलेल्या अत्याचारामुळे त्यांनी हा मार्ग पत्करला, असं सिनेमातून बिंबवण्याचा प्रयत्न याआधी केला गेला आहे. तसं देशप्रेम बिंबवण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने तर्काच्या आधारावर इतिहासाच्या घटनांचे वेध घेणाऱ्या पटकथेतून आदित्य धरने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलंय असं मला वाटतं. सर्वांनी हा चित्रपट अवश्य पाहावा", असं म्हणत योगेश सोमण यांनी 'धुरंधर' पाहण्यासाठी आवाहन केलं आहे.