'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
By कोमल खांबे | Updated: September 14, 2025 09:09 IST2025-09-14T09:09:04+5:302025-09-14T09:09:27+5:30
'दशावतार' सिनेमात मुख्य भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचाही विचार झाल्याची चर्चा होती. यावर आता दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी भाष्य केलं आहे.

'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
मराठीतील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'दशावतार' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर आणि गाण्यांनी सिनेमाची उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 'दशावतार' सिनेमात दिग्गज अभिनेत्री दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. पण, या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचाही विचार झाल्याची चर्चा होती. यावर आता दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी भाष्य केलं आहे.
'दशावतार' सिनेमाची टीम 'माझा कट्ट्यावर' आली होती. तेव्हा सुबोध खानोलकर म्हणाले की, "जर 'दशावतार' सिनेमाला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला तर ही गोष्ट गुंडाळून ठेवायची. कारण, ही गोष्ट इतर कोणीही सादर करू शकत नाही, हे आधीच ठरलं होतं. रजनीकांत नाव कुठून आलं मला माहीत नाही. पण, माझ्यासाठी दिलीप प्रभावळकर सर हे मराठीतील रजनीकांतपेक्षा कमी नाहीत. रजनीकांत वगैरे असा विचार आम्ही केला नव्हता".
"या कथेची गरज अशी होती की यातला बाबुलीचा रोल हा वृद्ध दशावतारी कलाकाराचा आहे. आणि त्याला अभिनेता, व्यक्ती म्हणून प्रचंड व्हेरिएशन्स आहेत. त्याचे वेगळे लूक्सही आहेत. ही भूमिका तशी कठीण होती. हे सगळं प्रभावीपणे करू शकणारं दिलीप प्रभावळकर सर सोडून दुसरं कुणीच डोक्यात नव्हतं. त्यामुळे मी दिलीप प्रभावळकरांना विचारलं आणि पटकथा लिहायच्या आधीच मला त्यांच्याकडून होकार मिळाला", असंही त्यांनी सांगितलं.
'दशावतार' हा सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंजलकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.