मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 15:32 IST2023-06-05T15:24:42+5:302023-06-05T15:32:03+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांनी सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेतले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ९४ वर्षाच्या होत्या. सुलोचना दीदी यांच्या निधनामुळे सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारत त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविला.
सुलोचना दीदी यांचं पार्थिव शरीर प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतलं आहे. नेते मंडळींसह अनेक कलाकारांनीही दीदींच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शन घेतलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट शेयर केले आहे.
मुख्यमंत्र्यांंचं ट्विट
सिनेसृष्टीची 'आई' अशी ओळख असलेल्या दिवंगत अभिनेत्री #सुलोचनादीदी लाटकर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. आज यांच्या दादर प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दीदींच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.
सुलोचना दीदींचे निधन ही महाराष्ट्राला आणि चित्रपटसृष्टीला चटका लावणारी घटना आहे. सुलोचना दीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी आपल्या आईपासून पोरकी झाली आहे असे मनोगत यावेळी व्यक्त केले.