"मी पुन्हा येईन हा माझा कॉपीराईट..", अनुपम खेर यांचं नाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 22:07 IST2025-08-05T22:05:23+5:302025-08-05T22:07:03+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुपम खेर यांचं कौतुक करताना खास शब्द वापरलेत. ज्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं

"मी पुन्हा येईन हा माझा कॉपीराईट..", अनुपम खेर यांचं नाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर नामांकित राज कपूर कपूर, व्ही शांताराम, जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्या चार मान्यवरांचा विशेष सन्मान झाला त्यांचं कौतुक केलं.
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिच्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काजोल यांच्या जन्मदिवशी हा पुरस्कार देताना मला विशेष आनंद वाटतो. त्यातही काजोल यांच्या आई या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहिल्या त्याचाही आनंद वाटतो. त्या काळामध्ये तनुजा यांच्यासारख्या मराठी मुलीने ते साम्राज्य प्रस्थापित केलं, त्याचा मला आनंद आहे."
या सोहळ्यात अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अनुपम खेर यांच्याबद्दल विशेष ओळख सांगायची नाही. सारांश या पहिल्याच सिनेमात त्यांनी ७० वर्षांची भूमिका साकारली. आज ७० वर्षांमध्येही ते विविध भूमिका साकारत आहेत. अनुपम खेर यांनी आज माझा एक डायलॉग चोरलेला आहे. मी पुन्हा येईन. याचा कॉपीराईट माझ्याकडे आहे. पण हरकत नाही. अनुपम यांना मी हा कॉपीराईट द्यायला तयार आहे."
व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने मुक्ता बर्वेला सन्मानित करण्यात आले. यावेळी मुक्ताचं कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, "मुक्ता बर्वे अतिशय गुणी अभिनेत्री. अभिनयाच्या क्षेत्रातील ३६० डीग्री मुक्ता बर्वेंच्या अभिनयात आपल्याला पाहायला मिळते. अनेकांनी मोनोलॉग सादर केले. पण चारचौघी मध्ये मुक्ता यांचा जो मोनोलॉग आहे तो अप्रतिम आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला याचा मला आनंद आहे."
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "महेश मांजरकेर सर. आवाजही काफी है. ते जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा ते प्रभाव पाडतात. त्यांच्यासारख्या कलावंताचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली हा आम्ही यांचा सन्मान समजतो."
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने गझलकार भीमराव पांचाळेंना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "अमरावती जिल्ह्याने आपल्याला दोन हिरे दिले. कवीवर्य सुरेश भट आणि गझलकार भीमराव पांचाळे. भीमराव यांच्या गझलांनी गेली ५० वर्ष सर्वांवर मोहिनी घातली आहे. या जोडीने गझलांना वेगळी उंची दिली आहे. मराठी गझलांमध्ये सुरेश भट आणि भीमराव पांचाळे ही जी जोडी आहे त्यांचा कोणी मुकाबला करत नाही. वर्धेच्या स्मशानात कार्यक्रम केला आणि परदेशातही कार्यक्रम केला."