"हा माझ्या महाराष्ट्राचा सन्मान...", हिमाचल सरकारकडून गौरवल्यानंतर छाया कदम झाल्या भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:31 IST2025-09-09T13:25:28+5:302025-09-09T13:31:16+5:30
हिमाचल प्रदेश सरकारकडून गौरवल्यानंतर छाया कदम यांनी पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला.

"हा माझ्या महाराष्ट्राचा सन्मान...", हिमाचल सरकारकडून गौरवल्यानंतर छाया कदम झाल्या भावुक
मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून छाया कदम (Chhaya Kadam) यांना ओळखलं जातं. 'सैराट', 'झुंड', 'न्यूड' ते 'लापता लेडीज', 'मडगांव एक्सप्रेस' अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. नुकतंच छाया कदम यांना त्यांच्या अभिनयातील योगदानाबद्दल हिमाचल प्रदेश सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही आनंदाची बातमी छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली.
छाया कदम यांनी ११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या. या फेस्टिवलमध्ये छाया कदम यांच्या 'लाल' या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग झालं. तसेच त्यांचा हिमालच प्रदेश सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. "हा केवळ माझा सन्मान नाही तर, माझ्या महाराष्ट्राचाही सन्मान आहे", या शब्दात इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
छाया कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पुढे सांगितले की, "११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी तर मिळाली. आणि सोबतच 'लाल' या माझ्या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग असल्यामुळे त्या आनंदात अजून भर पडली. पण, या सगळ्या सोबतच एक विशेष गोष्ट अशी घडली की, मी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या वतीने माझा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या सन्मानाच्या निमित्ताने दाखविण्यात आलेली माझी लहानशी डॉक्युमेंट्री मला भावनिकरित्या सुखावणारी होती. आणि अर्थात हा सन्मान केवळ माझा नाही तर ज्या मातीने माझ्यातला कलाकार घडविला त्या माझ्या महाराष्ट्राचाही आहे".
त्यांनी लिहलं, "या फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने हिमाचल प्रदेश आणि शिमलामधील अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुभवता आल्या. इथली माणसं, त्यांचे गोड स्वभाव अनुभवता आले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथल्या लोकांचे सिनेमा कलाकृतीवर असलेले प्रेम अनुभवता आले. खूप आनंद आणि एक कलाकार म्हणून खूप समाधान", असं त्या म्हणाल्या. छाया कदम यांच्या या यशाबद्दल त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.