'लिव्ह इन'च्या जमान्यात नात्यातील 'कमिटमेंट'ची गोष्ट, 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाच्या कलाकारांशी खास गप्पा
By कोमल खांबे | Updated: September 10, 2025 13:01 IST2025-09-10T13:00:42+5:302025-09-10T13:01:17+5:30
लिव्ह इनसारख्या विषयावर भाष्य करणारा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरिश ओक यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने कलाकार, दिग्दर्शक आदित्य इंगळे आणि निर्माते नितीन वैद्य यांनी लोकमतशी खास संवाद साधला.

'लिव्ह इन'च्या जमान्यात नात्यातील 'कमिटमेंट'ची गोष्ट, 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाच्या कलाकारांशी खास गप्पा
>> कोमल खांबे
लिव्ह इनसारख्या विषयावर भाष्य करणारा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातप्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरिश ओक यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने कलाकार, दिग्दर्शक आदित्य इंगळे आणि निर्माते नितीन वैद्य यांनी लोकमतशी खास संवाद साधला.
एक दिग्दर्शक म्हणून लिव्ह इनसारख्या विषयावर सिनेमा का करावासा वाटला?
दिग्दर्शक : स्क्रिप्ट लिहितानाच हे दोघे डोळ्यासमोर होते. त्यामुळे याच दोघांना घ्यायचे हे ठरले होते. डिजिटल वर्ल्डमध्ये वाढलेली मुले या जगाकडे वेगळ्या पद्धतीने बघतात. लिव्ह इन ही परिस्थिती आहे. पण, लिव्ह इनमध्येही कमिटमेंट असतेच. कदाचित काही नाही झाले तर बाहेर पडता येईल यामुळे लोक लिव्ह इनमध्ये राहत असतील. पण, आपण जगताना नात्याशिवाय राहू शकत नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न या सिनेमात केला गेला आहे.
या सिनेमातील तुझ्या पात्राविषयी काय सांगशील?
प्रिया : मी या सिनेमात जी भूमिका साकारते आहे ती मुलगी आजच्या काळातील आणि आजच्या पिढीतील आहे. तिच्यात आणि माझ्यात थोडे साम्य आहे. स्वत:ची मते खूप स्पष्टपणे मांडणारी आणि अत्यंत प्रेमळ आहे. कधी कधी ती मते मांडताना समोरच्या व्यक्तीचा विचार करत नाही. पण, त्या प्रत्येक निर्णयामागे तिची स्वत:ची काही कारणे आहेत. आपण जेव्हा कुठलेही निर्णय घेतो तेव्हा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. या सिनेमात तिच्या पात्राचा प्रवास आहे.
सिनेमा तुझी भूमिका काय आहे? निवेदिता सराफ आणि गिरिश ओक यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
उमेश: मी या सिनेमात आशय या एका अशा मुलाची भूमिका साकारतो आहे ज्या तरुणाचा लग्नसंस्थेवर विश्वास पण आहे. पण जोडीदारावर त्याचे नितांत प्रेम आहे. त्यामुळे तो लिव्ह इनमध्ये राहतो आहे. आजूबाजूच्या माणसांवर प्रेम करणारा, त्यांना आनंदी ठेवणारा, परिस्थितीनुसार निर्णय घेणारा आणि आनंदी आयुष्य जगणारा आहे. निवेदिताताई आणि गिरीश सरांसोबत काम करणे हे माझ्यासाठी खूप खास होते. कारण, मी लहानपणांपासून त्यांचे काम बघत आलो आहे.
तुमच्या पात्राविषयी काय सांगाल?
निवेदिता सराफ: मी या सिनेमात उमा नावाचे पात्र साकारते आहे. उमा खूप धाडसी निर्णय घेणारी आहे. तिच्यामध्ये निर्मळ मनाने क्षमा करण्याची ताकद आहे. उमा या भूमिकेला अनेक बाजू आहेत. ज्या या सिनेमातून दाखवल्या गेल्या आहेत. या सिनेमातील संवाद खूप छान आहेत. जे मला खूप भावले. प्रिया आणि उमेशबद्दल सांगायचे झाले तर ते दोघेही खूप मेहनती आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना मजा आली.
मराठी सिनेमांची निर्मिती करताना अजूनही कोणत्या अडचणी येतात?
नितीन वैद्य: दुर्देव हे आहे की आपल्याकडे सिनेमा कसा बघावा हे शिकवले जात नाही. साऊथमध्ये सिनेमा बघणे ही संस्कृती आहे. मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघत नसल्याने तेवढे उत्पन्न मिळत नाही आणि त्यामुळे मग सिनेमांचे बजेट कमी होते. त्यामुळे फार वेगळा सिनेमा बनवता येत नाही. कारण बजेटचे गणितच जुळत नाही.