शिवलिंगाचा शोध अन् सिक्कीमचा रोमांचक प्रवास, भरत जाधव-सुनील बर्वे-शरद पोंक्षेंच्या 'बंजारा' सिनेमाचा ट्रेलर बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:38 IST2025-05-02T13:38:05+5:302025-05-02T13:38:32+5:30
भरत जाधव- शरद पोंक्षे आणि सुुनील बर्वे या दिग्गज कलाकारांची भूमिका असलेल्या बंजारा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय, याशिवाय सिनेमा भूमिका साकारली आहे

शिवलिंगाचा शोध अन् सिक्कीमचा रोमांचक प्रवास, भरत जाधव-सुनील बर्वे-शरद पोंक्षेंच्या 'बंजारा' सिनेमाचा ट्रेलर बघाच
गेल्या काही दिवसांपासून भरत जाधव यांच्या आगामी ‘बंजारा’ चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो. भरत जाधव, शरद पोंक्षे आणि सुनील बर्वे यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळतेय. जाणून घ्या ‘बंजारा’ सिनेमाच्या ट्रेलरबद्दल.
‘बंजारा’ चित्रपटाचा रहस्यमयी आणि रोमांचक ट्रेलर
‘बंजारा’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसतं की, समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी हे तीन मित्र सिक्कीमकडे निघतात. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाट्याला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव येतो. जो त्यांच्या मैत्रीत, आयुष्यात आणि आत्मशोधात एक मोठा बदल घडवतो. पण तो अनुभव नेमका काय आहे? हे चित्रपट बघितल्यावरच कळेल. चित्रपटातील सिक्कीमचे अप्रतिम लोकेशन्स आणि दोन पिढ्यांतील मित्रांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटाला खास बनवते. २ मिनिटं २८ सेकंदाचा हा ट्रेलर प्रेक्षकांच्य् मनाची पकड घेण्यात यशस्वी झालाय.
कधी रिलीज होणार ‘बंजारा’
मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांची आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांचा लेक अभिनय आणि दिग्दर्शनात पदार्पण करतोय. तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी कहाणी सांगणारा ‘बंजारा’ सिनेमा पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.