“कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर महिन्याभरातच...”, शरद पोंक्षेंनी सांगितली ‘बाईपण भारी देवा’ची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 18:33 IST2023-07-20T18:30:37+5:302023-07-20T18:33:17+5:30
'बाईपण भारी देवा'बाबत 'ती' आठवण सांगताना शरद पोंक्षे भावुक, म्हणाले, "केदारने मला फोन करुन..."

“कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर महिन्याभरातच...”, शरद पोंक्षेंनी सांगितली ‘बाईपण भारी देवा’ची आठवण
‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामनात घर केलं आहे. खासकरुन महिला प्रेक्षकवर्ग हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगत प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा 'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई करत आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या २० दिवसांत ५७ कोटींची कमाई केली.
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाला भरघोस यश मिळाल्यानंतर सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी चित्रपटात अण्णांची भूमिका साकारलेले अभिनेते शरद पोंक्षे भावुक झालेले पाहायला मिळाले. शरद पोंक्षेंना २०१९ साली कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यावेळी केदार शिंदेंनी त्यांना फोन करत बाईपण भारी देवासाठी विचारलं होतं. शरद पोंक्षे आठवण सांगत म्हणाले, “२०१९ हा माझ्या आयुष्यातील भयंकर काळ होता. मला कर्करोगाने जखडलं होतं. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीतील काहींचा मला फोन आला होता. त्यातील एक महेश मांजेरकर आणि दुसरा म्हणजे केदार शिंदे.”
“आजारपण सुरू असताना एक दिग्दर्शक फोन करुन तुझ्यासाठी भूमिका ठेवली आहे, असं सांगतो. हे फार महत्त्वाचं असतं. कर्करोगातून मी बरा झाल्यानंतर एक महिनाही पूर्ण झाला नव्हता, तेव्हा मी या सिनेमाचं शूटिंग केलं आहे. म्हणून मी चित्रपटात तसा दिसतो. केदार आणि महेश दोघांनीही त्यांनी दिलेला शब्द पाळला,” असंही पुढे शरद पोंक्षे म्हणाले.
“टोमॅटोचे भाव बघून...”, शिल्पा शेट्टीने शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कौतुक करत शरद पोंक्षे म्हणाले, “थिएटरमध्ये मी अशा असंख्य महिला पाहिल्या, ज्या चित्रपट पाहायला याआधी कधीच थिएटरमध्ये आल्या नसतील. एकीकडे आपण मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाही असं म्हणतो. पण, थिएटर माहीत नसलेल्या बायकांना खेचून आणण्याची ताकद या चित्रपटात आहे. हा सिनेमा बघताना पुरुषांनाही ढसाढसा रडावंसं वाटतं. 'बाईपण भारी देवा' बघताना मी असंख्य वेळा रडलो. या सिनेमाची नोंद इतिहासात केली जाईल आणि त्याबरोबरच केदार शिंदेचंही नाव त्याबरोबर घेतलं जाईल.”