सोनाली बेंद्रेबरोबरच्या संवादानंतर केदार शिंदे भारावले, म्हणाले, “ज्या पद्धतीने त्यांनी…”
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 12:01 IST2023-08-21T12:01:04+5:302023-08-21T12:01:41+5:30
‘बाईपण भारी देवा’च्या टीमने नुकतीच 'इंडिया बेस्ट डान्सर' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सोनाली बेंद्रेने केदार शिंदेबरोबर संवाद साधला.

सोनाली बेंद्रेबरोबरच्या संवादानंतर केदार शिंदे भारावले, म्हणाले, “ज्या पद्धतीने त्यांनी…”
दिग्दर्शक केदार शिंदे त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या चित्रपटाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेनेही ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक केलं होतं. नुकतंच ‘बाईपण भारी देवा’च्या टीमने सोनी टीव्हीवरील ‘इंडिया बेस्ट डान्सर’ या शोमध्ये हजेरी लावली होती. अभिनेत्री शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर आणि वंदना गुप्ते यांच्याबरोबर केदार शिंदेही उपस्थित होते. या शोमध्ये परीक्षक असलेल्या सोनाली बेंद्रेबरोबर केदार शिंदेंनी संवाद साधला.
सोनाली बेंद्रेबरोबर बोलल्यानंतर केदार शिंदे भारावून गेले आहेत. त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ‘इंडिया बेस्ट डान्सर’ शोच्या सेटवरील फोटो शेअर करत सोनालीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. “आम्ही २०२४ नंतर पहिल्यांदाच भेटलो. पण, ज्या पद्धतीने त्यांनी संवाद साधला, त्यावरुन त्यांचा मोठेपणा दिसून येतो. आपल्याकडे एखाद्या यशाने हुरळून जाणारी मंडळी पाहिल्यावर हे जाणवतं..”, असं केदार शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली...
काही दिवासांपूर्वी सोनाली बेंद्रेनेही ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कौतुक केलं होतं. सोनालीने तिच्या सोशल मीडियावर ‘बाईपण भारी देवा’च्या टीमबरोबरचा व्हिडिओ शेअर केला होता. “५० दिवस झाले तरी हा सिनेमा चित्रपटगृहात ठाण मांडून बसला आहे. केवळ स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीही सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. वाट कसली पाहताय...थिएटरमध्ये जा आणि चित्रपट बघा”, असं म्हणत सोनालीने ‘बाईपण भारी देवा’ पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केलं होतं.
दरम्यान, ‘इंडिया बेस्ट डान्सर’च्या मंचावर ‘बाईपण भारी देवा’च्या टीमने कल्ला केलेला पाहायला मिळाला. या चित्रपटातील अभिनेत्रींनी मंगळागौरीचा खेळही सादर केला होता. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या चित्रपटाने ५० दिवसांत ७६ कोटींचा गल्ला जमवला आहे.