आस्ताद काळे आणि शृजा प्रभुदेसाई पहिल्यांदाच एकत्र दिसणार नाटकात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:33 IST2025-04-01T18:32:57+5:302025-04-01T18:33:19+5:30
Sundar Mi Honar : पु.लं देशपांडे यांचे 'सुंदर मी होणार' हे नाटक तब्बल तीस वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे.

आस्ताद काळे आणि शृजा प्रभुदेसाई पहिल्यांदाच एकत्र दिसणार नाटकात
पु.लं देशपांडे यांच्या लेखणीतून साकार झालेलं 'सुंदर मी होणार' (Sundar Mi Honar Marathi Play) हे नाटक पुलंच्या स्मृतिदिनी आणि ज्येष्ठ साहित्यिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देखण्या नट संचात रंगमंचावर दाखल होणार आहे. पुलंचे 'सुंदर मी होणार' हे नाटक तब्बल तीस वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित अभिजात प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत. या नाटकाच्या निमित्ताने दोन गुणी कलाकार पहिल्यांदाच एकत्र रंगमंचावर पाहायला मिळणार आहेत. अभिनेता आस्ताद काळे (Astad Kale) आणि अभिनेत्री शृजा प्रभुदेसाई (Shruja Prabhudesai) ही नवी जोडी या नाटकच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे.
करण देसाई आणि आकाश भडसावळे निर्मित करीत असलेल्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा नुकताच शानदार मुहूर्त मुंबईत संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री (पद्मश्री) नयना आपटे, पुलंचे पुतणे जयंत देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आवर्जून उपस्थित होते. तरुण पिढीलाही पुलंची लेखणी अजून भुरळ घालीत असल्याचे समाधान व्यक्त करून या नवीन पण समर्थ संचातील नाटकाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
त्या त्या काळात रंगभूमीवर येऊन गेलेल्या अनेक अजरामर नाट्यकलाकृती स्मरणरंजनाच्या पुनःप्रत्ययाच्या आनंदासोबत काहीतरी विचार देऊ पाहण्याच्या उद्देशाने नव्याने रंगभूमीवर येत असतात. याच मांदियाळीतलं पु.ल.देशपांडे यांच्या लेखणीतून सजलेलं नाट्यकृतीतलं एक सुंदर पान उलगडलं जातंय याचा आनंद दिग्दर्शक राजेश देशपांडे व्यक्त करतात.
सुंदर मी होणार' हे नाटक पु. ल. देशपांडे यांनी तीन इंग्रजी कथानकांवर आधारित लिहिले असले तरीही महाराष्ट्राच्या मराठी मातीचा एक छान गंध आणि मराठमोळेपण देऊन या नाटकाला त्यांनी अधिकच सुंदर केले आहे. नाटकाचे संगीत मिलिंद जोशी यांचे आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. नाटकाचे व्यवस्थापन नितीन नाईक यांचेकडे आहे.