"मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट आपली चुकतेय..." भारत-पाक सामन्याबद्दल लोकप्रिय गायकानं मांडलं स्पष्ट मत, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:07 IST2025-09-15T13:05:24+5:302025-09-15T13:07:07+5:30

लोकप्रिय गायकानं भारत-पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Asia Cup 2025 Ind Vs Pak Mangesh Borgaonkar Share Video Urges Addressing Issues Beyond Politics | "मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट आपली चुकतेय..." भारत-पाक सामन्याबद्दल लोकप्रिय गायकानं मांडलं स्पष्ट मत, म्हणाला...

"मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट आपली चुकतेय..." भारत-पाक सामन्याबद्दल लोकप्रिय गायकानं मांडलं स्पष्ट मत, म्हणाला...

Mangesh Borgaonkar Video: दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या (Ind Vs Pak) सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय नोंदवला.  टीम इंडियाचा  कर्णधार सूर्यकुमार यादव याने षटकार मारत संघाच्या विजयावर शिक्का मोर्तब केला. पण, या सामन्यापुर्वी भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळावं की नाही? यावरून मोठं वादंग निर्माण झालं होतं. अनेकांनी संताप व्यक्त करत भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी केली होती. याच विषयावर लोकप्रिय मराठी गायक मंगेश बोरगांवकरनं स्पष्ट मत मांडलं. "एकत्र राहिलो तर उभे राहू… विभागलो तर कोसळू" असं म्हणत त्याने भारत-पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मंगेश बोरगांवकरनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, "एकत्र राहिलो तर उभे राहू… विभागलो तर कोसळू". व्हिडीओमध्ये तो म्हणतो,  "भारत-पाकिस्तान मॅचबद्दल ज्याप्रकारे समाजात दोन गट पडलेत, कोणी म्हणतंय काही हरकत नाही, मॅच तर आहे… तर काही जण म्हणत आहेत, नाही आपण बोललो होतो की, पाकिस्तानबरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत आणि आपण आपल्यातच भांडतो आहोत. ज्यांनी ही मॅच ठरवली, त्याचं नियोजन केलं. ते लोक तर तिथे लाइव्ह मॅच पाहत आहेत. त्यामुळे विनाकारण आपण एकमेकांमध्ये भांडून काय उपयोग आहे?"

 तो म्हणाला, "आपलं काय चुकतंय? मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट आपली चुकतेय, ती म्हणजे आपण कुठल्याही राजकारण्यांचे चाहते होतोय. भाजपा असो… काँग्रेस असो… किंवा कोणताही पक्ष असो… आपण चाहते का होत आहोत? आपण त्यांना आपलं काम करून देण्यासाठी निवडून दिलं आहे. ते आपले सेवक आहेत. मग आपण त्यांचे चाहते का होत आहोत. जेव्हा सेवक तुमचे देव बनतात, तुम्ही त्यांना गुरू मानायला लागता किंवा सर्वस्व मानता, तेव्हा हेच होणार आहे. तुमचा-आमचा विचार होणारच नाही. आपलं काय झालंय ना?".

पुढे तो म्हणाला, "आपण कुणाचे तरी भक्त झालो आहोत. काँग्रेस असो, भाजपा असो किंवा आणखी कोणी… हे करून कधीच भलं होणार नाही. जात-धर्म-पंथ या गोष्टी आता संपल्या आहेत, हाताबाहेर गेल्यात. त्यात तुम्ही काही करू शकणार नाही. आता तुम्ही एकत्र येऊ शकता, ते रस्ते, वीज किंवा तुमच्या प्राथमिक गरजांसाठी, अजून आपण तिथेच आहोत. वीज, पाणी, रस्ते, ट्रॅफिक या समस्या आहेत, तर यासाठी जेव्हा आपण एकत्र येऊ, मग ते कोणतंही सरकार असो… आज भाजपाचं आहे, उद्या कोणी काँग्रेसचं असेल किंवा आणखी कुणाचंही असेल. मी कोणाच्याही बाजूनं बोलत नाहीये".

नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत तो म्हणाला, "आपण नागरिक म्हणून एकत्र येत नाही आहोत, त्यामुळे आपण हे सगळं भोगत आहोत. त्या ठिकाणी आपण आपली उर्जा लावली पाहिजे. त्या ठिकाणी आपण एकत्र आलो तर ज्या गोष्टी आपल्या नागरिक म्हणून नकोत, त्या घडणार नाहीत. नाहीतर उद्या आपणही सत्तेत असू, तेव्हा आपणही हेच करू. त्यामुळे मला असं वाटतं की,  नागरिक शास्त्र हे बेसिक आपल्याला मुलांना पुढच्या पिढीला  काही गोष्टी शिकवणं गरजेचं आहे,  नागरिक म्हणून काय करायचं? आपल्या मागण्या काय आहेत? त्या पूर्ण कशा करायच्या? कुठल्या तरी खोट्या आश्वासनांना, पैशांना, भुलथापांना बळी पडायचं नाही. समाज म्हणून आपण एकत्र असणं गरजेचं आहे. आणि ते होत नाहीय, म्हणून आपण सर्व पात्र नसलेल्या गोष्टी भोगत आहोत".

पुढे तो म्हणाला, "आपण कितीतरी कर भरत आहोत. कुठल्याच गोष्टीत आपण समाधानी नाही, मग उपयोग काय?  जात-धर्म-पंथ आता कामाला येणार नाहीत. त्यांचा काही उपयोग नाही. सगळे एकत्र राहिले, तरच काहीतरी घडणार आहे. मॅच न बघितल्यानं काय होणार आहे मला सांगा… तुम्ही मॅच बघणार नाही, मग ते कोणत्या तरी हॉटेलमध्ये दाखवतील, त्यावर बंदी घाला वगैरे मागणी केली गेली. अरे, पण त्यांचा व्यवसाय आहे तो… ते भारतातील आपलेच लोक आहेत. उद्या तुमचं किंवा माझं हॉटेल असेल आणि ते कोणी असं बंद केलं तर जमेल का? ज्यांनी हा मॅच खेळण्याचा निर्णय घेतला आहे, तर इथला व्यवसाय बंद करण्याची काय गरज आहे? तुम्ही मॅच बघून किंवा न बघून काय होणार आहे? तुम्ही निषेध केला, काय फरक पडणार आहे".

व्हिडीओच्या शेवटी तो म्हणाला, "माझं एवढंच म्हणणं आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन, हुशारीनं डोकं वापरून, खरं काय चाललंय आणि आपल्याबरोबर कसं राजकीयरित्या खेळलं जातंय हे लक्षात घेतलं पाहिजे. आपलं ध्येय, उद्दिष्ट पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. तेच करून घेणं गरजेचं आहे. कारण- आता ते कोणी करणार नाही. हे नाही केलं, तर मग समाजात जे सुरू आहे तेच पुढेही सुरू राहणार. समाजात दुफळी निर्माण होणं, हेच सत्ताधारी किंवा राजकारण्यांना हवं असतं. आपणच आपल्यात भांडणं, आपणच आपल्यात मरणं हेच त्यांना हवं असतं. त्यामुळे विचार करा", असं त्यानं म्हटलं. 


Web Title: Asia Cup 2025 Ind Vs Pak Mangesh Borgaonkar Share Video Urges Addressing Issues Beyond Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.