अशोक सराफ लेकाच्या त्या निर्णयामुळे झालेले नाराज, बोलणं केलेलं बंद, निवेदिता यांनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:09 IST2025-11-01T10:08:27+5:302025-11-01T10:09:51+5:30
Nivedita Saraf : मराठी सिनेइंडस्ट्रीतील सर्वांचे लाडके 'मामा' अर्थात अशोक सराफ यांच्या 'मी बहुरुपी' या आत्मचरित्राने सध्या वाचकांना खिळवून ठेवलं आहे. यात निवेदिता सराफ यांनी एका महत्त्वाच्या नात्यावर प्रकाश टाकला आहे तो म्हणजे अशोक सराफ आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत यांच्यातील नातेसंबंधांवर.

अशोक सराफ लेकाच्या त्या निर्णयामुळे झालेले नाराज, बोलणं केलेलं बंद, निवेदिता यांनी सांगितला किस्सा
मराठी सिनेइंडस्ट्रीतील सर्वांचे लाडके 'मामा' अर्थात अशोक सराफ यांच्या 'मी बहुरुपी' या आत्मचरित्राने सध्या वाचकांना खिळवून ठेवलं आहे. यात त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच कौटुंबिक जीवनातील अनेक रंजक आणि भावनिक किस्से उलगडले आहेत. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी यात एका महत्त्वाच्या नात्यावर प्रकाश टाकला आहे तो म्हणजे अशोक सराफ आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत यांच्यातील नातेसंबंधांवर.
अनिकेत सराफने करिअरसाठी शेफ होण्याची वाट निवडली. आज अशोक सराफ आणि निवेदिता यांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, जेव्हा अनिकेतने हा निर्णय घेतला आणि विशेषतः परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार केला, तेव्हा सुरुवातीला अशोक मामा काहीसे नाराज झाले होते, अशी आठवण निवेदिता यांनी 'मी बहुरुपी'मध्ये सांगितली आहे.
पण दोघांमधला संवाद कमी झाला...
निवेदिता सांगतात की, अनिकेत लहान असताना अशोक सराफ त्यांच्या करिअरच्या शिखरावर होते. सतत शूटिंग आणि प्रचंड व्यग्र शेड्युल असूनही ते मुलासाठी वेळ काढायचे. मात्र, अनिकेत जसा मोठा झाला, तसतसे त्यांचे नाते थोडे बदलले. "त्यांच्या वयातलं अंतर किंवा दोघांचे विरुद्ध स्वभाव यामुळे असेल, पण दोघांमधला संवाद कमी झाला. या बाप-लेकात अनेकदा मला मध्यस्थी व्हावं लागायचं.", असे निवेदिता यांनी सांगितलं.
हा नात्यातला 'गुंता' मात्र कायम राहिला नाही!
निवेदिता पुढे म्हणाल्या की, एक दिवस अनिकेतने स्वतःहून पुढाकार घेतला. तो वडिलांजवळ जाऊन बसला आणि त्याने गप्पांची सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू दोघांमधील संवाद वाढला. ते एकमेकांसोबत आपले विचार मोकळेपणाने शेअर करू लागले. यादरम्यान, अशोक सराफ यांनाही नवीन पिढी आणि त्यांच्या विचारांबद्दल जाणून घेणं किती गरजेचं आहे, याची जाणीव झाली. अशा प्रकारे, काळानुसार दोघांच्या नात्यातील मतभेद दूर झाले आणि त्यांची ही बाप-लेकाची हळवी गोष्ट अधिक घट्ट झाली.