Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मुंबईत लग्न न करता गोव्यातील या मंदिरात केले होते लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 15:37 IST2019-06-04T15:31:32+5:302019-06-04T15:37:34+5:30
निवेदिता आणि अशोक हे त्या काळातही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असल्याने ते मुंबईत लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी लग्न मुंबईत न करता गोव्यात केले होते.

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मुंबईत लग्न न करता गोव्यातील या मंदिरात केले होते लग्न
अशोक सराफ यांचा आज म्हणजेच ४ जूनला वाढदिवस असून त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्यासोबत झाले असून त्यांना अनिकेत हा मुलगा देखील आहे.
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांच्यामध्ये १८ वर्षांचे अंतर आहेत. अशोक सराफ निवेदिता पेक्षा १८ वर्षांनी मोठे आहेत. निवेदिता आणि अशोक यांच्यात चांगली मैत्री होती आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्न केले.
निवेदिता आणि अशोक यांच्या लग्नाचा किस्सा खूपच छान आहे. निवेदिता आणि अशोक हे त्या काळातही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असल्याने ते मुंबईत लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी लग्न मुंबईत न करता गोव्यात केले होते. गोव्यात मंगेशीच्या देवळात त्या दोघांचे लग्न झाले. मंगेशी देवी अशोक सराफ यांची कुलदैवता असल्याने त्या दोघांनी गोव्याला जाऊन मंगेशीच्या देवळात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत अनेक वेळा त्याच्या आई वडिलांसोबत कार्यक्रमांना हजेरी लावतो. पण अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती याविषयी त्याला अजिबातच प्रेम नाहीये. त्याला रस आहे जेवण बनवण्यात. तो खूप चांगला शेफ असून तो पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबला निक सराफ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. त्याच्या या व्हिडिओला अनेकांनी लाइक केले असून या व्हिडिओंना खूप चांगले व्ह्यूज मिळतात.