अमृता खानविलकरला 'चंद्रमुखी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, पोस्ट शेअर करत म्हणाली…
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:49 IST2025-08-06T15:49:00+5:302025-08-06T15:49:32+5:30
अमृता खानलविलकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

अमृता खानविलकरला 'चंद्रमुखी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Maharashtra State Marathi Films Awards 2025: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा काल मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात अमृता खानलविलकरला 'चंद्रमुखी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सध्या अमृता 'सुंदरी-अदा ताल श्रृंगार' या कार्यक्रमानिमित्त विदेश दौऱ्यावर असल्याने तिच्यावतीने हा पुरस्कार दिग्दर्शक प्रसाद ओकने स्वीकारला. याचनिमित्ताने अमृता खानलविलकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला.
अमृता खानलविलकरने पोस्ट शेअर करत लिहलं, "६०वा आणि ६१वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला आणि त्यात मला 'चंद्रमुखी'साठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही, तर खूप मोठी जबाबदारी आहे. हा पुरस्कार मिळाला, हे अजूनही खरं वाटत नाही. पण आज महाराष्ट्र शासनाने, माझ्या राज्याने, मला असा मान दिला याचा मनापासून अभिमान वाटतोय".
पुढे तिनं लिहलं, "या पुरस्कारासाठी संपूर्ण 'चंद्रमुखी' टीमचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार, स्पॉट बॉय ते मेकअप आर्टिस्ट... सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही घेतलेली मेहनत, दिलेलं प्रेम, हेच आज या पुरस्काराच्या रूपाने फळाला आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचेही विशेष आभार. कलाकारांवर विश्वास ठेवून, आमच्या कामाचं असे मनापासून कौतुक केल्याबद्दल".
ती म्हणाली, "आज 'चंद्रमुखी'च्या रूपाने प्रेक्षकांनी मला ज्या प्रकारे स्वीकारलं, त्या प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक भेटलेला प्रेक्षक, त्यांच्या डोळ्यातलं प्रेम सगळं आठवतंय आज. जर मला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळालेली असेल, तर ती माझ्या महाराष्ट्रामुळे. हा माझा पहिलाच राज्य पुरस्कार आहे आणि म्हणूनच तो अधिक खास आहे. कायमच लक्षात राहणारा. पण त्याचबरोबर एक गोष्ट ठामपणे मनात आहे की हा पुरस्कार म्हणजे थांबण्याची वेळ नाही, तर अजून चांगलं, दर्जेदार आणि मनापासून काम करत राहण्याची नवी प्रेरणा आहे".
शेवटी ती म्हणते, "आता यानंतर फक्त एवढंच करायचंय की चांगल्या लोकांबरोबर काम करत राहायचं, सुंदर कथा सांगायच्या आणि आपल्या प्रेक्षकांच्या हृदयात पुन्हा एकदा घर करायचं. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या सर्व ज्युरी सदस्यांचे आणि संपूर्ण टीमचेही खूप खूप आभार. हा अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी कायम ऋणी आहे. मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र", या शब्दात तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.