"लग्न टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नाही...", अमृता खानविलकरने तरुण पिढीला दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:55 IST2026-01-13T15:54:53+5:302026-01-13T15:55:28+5:30
लग्नानंतर लेकीने तिच्या आईवडिलांना आर्थिक मदत करावी का? अमृता म्हणाली...

"लग्न टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नाही...", अमृता खानविलकरने तरुण पिढीला दिला सल्ला
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर कायम तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. सध्या अमृता तिच्या नवीन नाटकामुळे चर्चेत आहे. स्वप्नील जोशीसोबत ती 'लग्नपंचमी' या नाटकात दिसणार आहे. नुकतंच अमृताने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये तिने लग्न, घटस्फोट, मुला मुलीमधला संवाद यावर भाष्य केलं. नवीन पिढीला तिने मोलाचा सल्ला दिला.
'अमुक तमुक'ला दिलेल्या मुलाखतीत अमृता खानविलकर म्हणाली, "लग्न हे फक्त त्या दोघांचं नसतं तर दोन कुटुंबही एकत्र आलेली असतात. मग जर मुलीच्या कुटुंबाला कशाची गरज असेल तर लेकीने मदत का करु नये? आजही फक्त सासरच्याच माणसांची काळजी घ्यायची असं का आहे? सासरच्या माणसांना दुखावूनही ती स्त्री काही करु शकत नाही. अर्धा जीव इकडे आणि अर्धा तिकडे असतो. जर तिने सासरच्या माणसांना समजावलं, त्यांच्याशी संवाद साधू शकली तर नक्कीच हे प्रश्न पडणार नाहीत. यासाठी मुलगा आणि मुलीने लग्नाआधीच यावर चर्चा करणं खूप गरजेचं आहे."
"फक्त प्रेम हे लग्नाला टिकवू शकत नाही. मुलगा आणि मुलगी कमावणारे असतील तर तुम्ही सगळ्या गोष्टींवर आधीच चर्चा करा. मुलं हवीत की नको, एकत्र कुटुंबात राहायचं की नाही, दोन्हीकडच्या पालकांना किती पैसे द्यायचे हे सगळं आधीच ठरवून घ्या. हे इगोवर घेऊ नका. सध्या जे घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय याचं कारण संवाद कमी असणं हेच आहे. संवाद हे मानवाला मिळालेलं सुंदर यंत्र आहे. आपल्याकडे बोलायला शब्द आहेत त्याचा वापर करा. नंतर उगाच काहीतरी होऊन बसणार, मग तुम्ही आणि कुटुंबीय डोक्याला हात लावणार यापेक्षा बोलून आधीच गोष्टी सांभाळा."