"ज्याची मूर्ती छोटी असते..." अजित पवारांनी स्पृहाचं केलं कौतुक, आर. आर. पाटलांची काढली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:45 IST2025-08-25T15:45:25+5:302025-08-25T15:45:54+5:30

आर. आर. पाटील यांची आठवण काढत अजित पवारांनी केलं स्पृहा जोशीचं कौतुक!

Ajit Pawar Praised Spruha Joshi Remembered R. R. Patil Akhil Bharatiya Marathi Natya Parishad Vardhapandin | "ज्याची मूर्ती छोटी असते..." अजित पवारांनी स्पृहाचं केलं कौतुक, आर. आर. पाटलांची काढली आठवण

"ज्याची मूर्ती छोटी असते..." अजित पवारांनी स्पृहाचं केलं कौतुक, आर. आर. पाटलांची काढली आठवण

 Ajit Pawar Praised Spruha Joshi: अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वर्धापनदिन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी अभिनेत्री आणि कवयित्री  स्पृहा जोशी (Spruha Joshi) हिचा कै. स्मिता पाटील पुरस्काराने विशेष गौरव करण्यात आला.  यावेळी अजित पवारांनी कार्यक्रमात संबोधित करताना स्पृहा जोशीचं कौतुक केलं. 

अजित पवार म्हणाले, "स्पृहा जोशी यांना आपण पुरस्कार प्रदान केला. कवयित्री, गीतकार आणि अभिनेत्री असणारी स्पृहा संवेदनशील कलाकार आहे. लोकमुद्रा, चांदणचुरा हे तिचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. अग्निहोत्र, उंच माझा झोका यासारख्या मालिकांमध्ये काम करुन तिने आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा महाराष्ट्राच्या रसिकांसमोर उमटवला आहे. देवा - एक अतरंगी,  कॉफी,  शर्यत यासारख्या चित्रपटांतून तिने अतिशय प्रभावी अभिनय केला आहे. गीतकार म्हणून बावरे प्रेम हे, सांग ना... ही तिची गाणी लोकप्रिय झाली".

पुढे मिश्किलपणे अजित पवार म्हणाले, "स्पृहा मगाशी म्हणाली मी दिसतेय का? पण तिला काय माहिती, कीर्ती मोठी कुणाची असते, ज्याची मूर्ती छोटी असते, त्यामुळे तू काही काळजी करु नकोस, लाल बहादूर शास्त्री असेच होते. मूर्ती लहान होती पण कीर्ती महान होती, आमच्या राजकारणामध्ये आर.आर पाटील हयात नाहीयेत, पण मी त्याला टिल्ल्या म्हणायचो. मूर्ती लहानच होती, पण कीर्ती मोठी मिळवली"

पुढे ते म्हणाले, "आजही कुठल्याही ग्रामीण भागात गेल्यावर सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला आर.आर पाटील... त्याने साधा मका भरडून दिवाळी साजरी केलेली. परंतु तो पुढे राज्याचा उपमुख्यमंत्री झाला. कदाचित २००४ मध्ये आमच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्रिपद घेतलं असतं, तर त्यांना किंवा भुजबळांना संधी मिळाली असती, एवढी त्यांची क्षमता किंवा ताकद होती. पण ठीक आहे. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात, अशातला भाग नाही. पण काम करत राहणं आपल्या हातात असतं. कर्तव्याच्या भावनेतून तुम्ही सगळे काम करत राहताय. त्यातून मराठी रंगभूमीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न स्पृहा आणि त्यांची टीम करत आहे", या शब्दात अजित पवारांनी स्पृहा जोशीचं कौतुक केलं. 

या कार्यक्रानंतर स्पृहानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कै. स्मिता पाटील पुरस्काराने गौरवल्याबद्दल आभार व्यक्त केले. तिनं लिहलं,  "स्मिता पाटील हे नाव म्हणजे केवळ अभिनेत्री नव्हे, तर एक सामर्थ्यशाली व्यक्तिमत्त्व... त्यांच्या अभिनयातील प्रामाणिकपणा, तीव्रता आणि संवेदनशीलता याने सिनेमाला नवी भाषा दिली. काल त्यांच्या नावाशी जोडलं जाणं ही माझ्यासाठी केवळ सन्मानाची बाब नाही, तर पुढे काम करताना त्यांच्या नावाने मिळालेल्या ह्या पुरस्काराची जाणीव ठेवण्याची जबाबदारीसुद्धा आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माननीय अशोक हांडे ह्यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचे मनापासून आभार! लोभ आहेच तो वाढत जाओ...", असं तिनं म्हटलं. 


Web Title: Ajit Pawar Praised Spruha Joshi Remembered R. R. Patil Akhil Bharatiya Marathi Natya Parishad Vardhapandin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.