"डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं..."; 'अभंग तुकाराम' सिनेमात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अजिंक्यचा भारावणारा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:26 IST2025-10-21T16:25:27+5:302025-10-21T16:26:11+5:30
अजिंक्य राऊत अभंग तुकाराम सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. अजिंक्यने त्याचा भारावणारा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे

"डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं..."; 'अभंग तुकाराम' सिनेमात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अजिंक्यचा भारावणारा अनुभव
सध्या मराठी मनोरंजन विश्वात 'अभंग तुकाराम' सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा सिनेमा काहीच दिवसांमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्याचा एक वेगळा पैलू या सिनेमातून बघायला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेता अजिंक्य राऊत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अजिंक्य राऊतने या सिनेमात काम करण्याचा अनुभव सांगितला.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य म्हणाला की, ''मी माझ्या पहिल्या किंवा दुसऱ्या मालिकेत रडण्याचा सीन असेल तर तो सीन अनुभवण्यासाठी ग्लिसरीन घ्यायचो. कारण ती सुरुवात व्हावी आणि नंतर मी तो क्षण जगावा, असं माझं नेहमी असायचं. पण या सेटवरचं वातावरण म्हणा किंवा ज्यानुसारचं लिखाण होतं, याशिवाय योगेश सरांनी याआधीही संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांचा तो अनुभव आणि हे सर्व प्रत्यक्षात मी पाहत होतो. याशिवाय मी स्वतः त्या भूमिकेत मी होतो.''
''मी ज्या कपड्यांमध्ये होतो, तो जिरेटोप मी प्रत्यक्षात बघितला. अशावेळी माणूस दंग होऊन जातो. सतत डोळ्यात पाणी होतं, आतमध्ये एक गलबलायला होत होतं. छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांना भेटतात आणि पुढे त्या गोष्टी घडत जातात. मी प्रत्येक भावना आणि शब्द मनापासून अनुभवले आहेत. माझी आशा आहे, की हे प्रेक्षकांपर्यंतही पोहचेल.'' अशाप्रकारे अजिंक्य राऊतने त्याचा अनुभव शेअर केला आहे. अजिंक्य या सिनेमात १९ वर्षांच्या छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. 'विठू माऊली' मालिकेनंतर अजिंक्यला या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.