"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:56 IST2025-11-13T10:55:38+5:302025-11-13T10:56:25+5:30
हिंदीत अॅक्शन हिरो बनायचं होतं पण..., अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया

"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
मराठीतील हँडसम हिरो अजिंक्य देव सध्या अनेक हिंदी-मराठी सिनेमांमध्ये दिसत आहे. मराठीतला एक काळ गाजवणारे अजिंक्य देव मधल्या काळात गायब होते. त्यांनी काही हिंदी सिनेमांमध्येही नशीब आजमावलं मात्र त्यांना यश मिळालं नाही. 'माहेरची साडी','माझं घर माझा संसार', 'सर्जा', 'कशासाठी प्रेमासाठी' असे अनेक मराठी सिनेमे केले जे सुपरहिट झाले. नंतर त्यांनी हिंदीत अॅक्शन हिरो बनायचं स्वप्न पाहिलं होतं. पण तिथे त्यांना अपयश आलं. याचं कारण नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
'कॅचअप' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव म्हणाले, "अॅक्शन हिरो व्हायचं म्हणून मी हिंदीत शिरलो होतो. प्रयत्न करत होतो. अक्षय कुमार, अजय देवगणही तेव्हाच आले होते. आम्ही एकत्र कामंही केलं. अक्षयसोबत मी तेव्हा 'पांडव' सिनेमा केला होता. मी मराठीतला एकदम मोठा स्टार आहे या दृष्टीने ते माझ्याकडे बघायचे. मी हिंदीत शिरण्याचा खूप प्रयत्न केला पण मराठी अभिनेता म्हणून मला त्या लॉबीने शिरु दिलं नाही. अडचणी आल्या. माझ्या वडिलांनी रमेश देव यांनी तो खरं ब्रेक केला होता. डॉ. लागू, नाना पाटेकर यांनीही ९० च्या दशकात तो ब्रेक केला होता. पण माझ्या वेळी अनेक स्टारकिड्स आले. कुमार गौरव, अजय देवगण, सनी देओल आम्ही सगळे एकाच काळातले आहोत. नंतर शाहरुखचा काळ आला."
ते पुढे म्हणाले, "मला वाटतं माझ्यातही काहीतरी कमी असेल. मी डान्स नीट शिकायला हवा होता. कदाचित मीही ती लॉबी ब्रेक करु शकलो असतो. पण मी माझ्या एकाच कलेवर अवलंबून होतो. तेव्हाच बाबांनी निर्मिती संस्थाही सुरु केली होती. मग त्यांच्याबरोबर काम करायला लागायचं, मदत करायची. हे सगळं होत असायचं. त्यामुळे कुठेतरी माझीही चूक आहे. दुर्लक्ष झालं असेल. मी थोडा निष्काळजी वागलो असेल. पण आज मी अनेक मोठे सिनेमे करत आहे आणि चांगल्या भूमिका करत आहे."
अजिंक्य देव नुकतेच 'घरत गणपती', 'मी आणि अमायरा' या मराठी सिनेमांमध्ये दिसले. लवकरच ते रणबीर कपूरसोबत 'रामायण'मध्ये दिसणार आहेत. शिवाय नीतू कपूर आणि करिश्मा कपूरसोबतही त्यांनी प्रोजेक्ट केला आहे. एकूणच दोन्ही इंडस्ट्रीत ते सध्या व्यग्र आहेत.