प्रदर्शनाच्या १४ दिवसांनी चित्रपटावरून वाद सुरू, ‘हर हर महादेव’च्या विरोधावर दिग्दर्शकाने सोडले मौन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 07:14 AM2022-11-09T07:14:31+5:302022-11-09T07:15:04+5:30

चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी यासंदर्भात बाजू मांडली आहे.

After 14 days of release the film's controversy started the director broke silence on the opposition to 'Har Har Mahadev' | प्रदर्शनाच्या १४ दिवसांनी चित्रपटावरून वाद सुरू, ‘हर हर महादेव’च्या विरोधावर दिग्दर्शकाने सोडले मौन 

प्रदर्शनाच्या १४ दिवसांनी चित्रपटावरून वाद सुरू, ‘हर हर महादेव’च्या विरोधावर दिग्दर्शकाने सोडले मौन 

googlenewsNext

मुंबई :

‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर १४ दिवसांनी वादात सापडला आहे. या चित्रपटाचे महाराष्ट्रभर नियमित शो सुरू असताना सोमवारी रात्री अचानक चित्रपटाच्या आशयावर  आक्षेप घेत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ठाण्यात शो बंद पाडला. त्याचे मंगळवारी पडसाद उमटले. यावरून राजकारण पेटले आहे. 

चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी यासंदर्भात बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाचे शो बंद पाडून तुम्ही महाराजांचा अपमान करत आहात. यासाठी सर्वांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी. आयुष्यातील आठ वर्षे यासाठी खर्च केल्याने महाराजांचा अवमान होईल, असे संदर्भ वापरू शकत नाही. सेन्साॅर बोर्डाच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरच चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाले आहे. घडलेला प्रकार लांच्छनास्पद असल्याचे देशपांडे म्हणाले. 

अभिजीत देशपांडेंच्या उलट्या बोंबा : अशोक राणा 
या विषयावर ‘लोकमत’शी बोलताना इतिहास अभ्यासक अशोक राणा म्हणाले की, अभिजीत देशपांडेंच्या कुटुंबीयांशी माझे खूप जुने संबंध आहेत; पण त्यांनी माफी मागण्याचे केलेले विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक या नात्याने देशपांडेंवर तातडीने फौजदारी कारवाई करून त्यांना अटकही करावी. सिनेमा लगेच थांबवावा. जाणीवपूर्वक इतिहासाची मोडतोड केली जात आहे.  

चित्रपटाला कायदेशीर नोटीस   
‘हर हर महादेव’ चित्रपटाला होणाऱ्या विरोधानंतर कायदेशीर नोटीस बजावण्याचे सत्रही सुरू झाले आहे. ॲडव्होकेट विकास शिंदे यांनी अभिजीत देशपांडे यांच्यासह चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संभाजी ब्रिगेडसह सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज, अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती- पुणे, मराठा सेवा संघ- पुणे, वीर बाजी पासलकरांचे वंशज, बांदलांचे वंशज, अखिल भारतीय मराठा महासंघ अशा एकूण १२ जणांच्या वतीने शिंदे यांनी ही नोटीस पाठवली आहे.

महाराजांविरुद्ध बाजीप्रभू हे महाराष्ट्र पचवेल ? : आव्हाड 
मराठ्यांच्या इतिहासाचा विपर्यास कुठल्या हेतूने? शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल? असे प्रश्न विचारत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण घटनाक्रमावर आपले मत व्यक्त केले.  गेल्या ६०-७० वर्षांमध्ये मराठ्यांचा इतिहास विकृत करण्याचे असंख्य प्रयत्न झाले. महाराजांच्या इतिहासाची सिनेमाद्वारे वारंवार विकृत मांडणी करणारे दिग्दर्शक सनातनी मनुवादी आहेत, अशा आशयाची पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी लिहिली आहे.

ठाण्यात तीन मोफत शो
‘हर हर महादेव’ चित्रपट पाहण्यासाठी आलेला प्रेक्षक परीक्षित दुर्वे हा मद्यप्राशन करून आला होता, हे ठरविणारे तुम्ही कोण, असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मद्यप्राशन करून आले होते. त्यामुळेच त्यांची मारहाण करण्याची हिंमत झाल्याचा आरोप मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. मनसेतर्फे मंगळवारी सायंकाळी त्याच मॉलमध्ये मोफत शो आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला एक स्क्रीन बुक करण्यात आला होता. मात्र, प्रेक्षकांची गर्दी वाढल्याने तीन स्क्रीन येथे बुक करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

 

Web Title: After 14 days of release the film's controversy started the director broke silence on the opposition to 'Har Har Mahadev'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.