श्रिया पिळगावकर मराठी सिनेमात का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:09 IST2025-06-03T14:07:52+5:302025-06-03T14:09:49+5:30

श्रिया पिळगावकर मराठी सिनेमात का दिसत नाही? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली...

actress shriya pilgaonkar reveals in interview about why she is not seen in marathi films know the reason | श्रिया पिळगावकर मराठी सिनेमात का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."

श्रिया पिळगावकर मराठी सिनेमात का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."

Shriya Pilgaonkar : सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर (Sachin Pilgonkar)  यांची लेक श्रिया पिळगावकरने (Shriya Pilgaonkar) ओटीटी विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ताजा खबर’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘मिर्झापूर’ अशा अनेक वेब सिरिजमधून ती प्रसिद्धीझोतात आली आहे. याशिवाय श्रियाने हिंदी चित्रपटांमध्ये धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. दरम्यान, लवकरच श्रिया पिळगावकर छलकपट या तिच्या आगामी सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परंतु, श्रिया ओटीटी माध्यमात रुळली असली तरी तिला पुन्हा मराठीत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने यावर भाष्य केलं आहे. 

नुकतीच श्रिया पिळगावकरने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, "असं काही ठराविक कारण नाही आहे की मी मराठीत काम करत नाहीये किंवा मला मराठी चित्रपटांमध्ये काम करायचं नाही आहे. माझ्या निरिक्षणातून मला एक गोष्ट जाणवली, 'एकुलती एक' नंतर मला ज्या मराठी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या त्यामध्ये मराठमोळेपण नव्हतं. त्या खूप मॉडर्न स्क्रिप्ट होत्या. पण, काहीतरी वेगळं करायचं होतं जे आपल्या मातीशी जोडलेलं असेल. त्यामुळे मराठीत मी जर काम केलं तर तशा पद्धतीचं काम करेन, असं ठरवलं."

त्यानंतर अभिनेत्री म्हणाली,"मी आजही मराठीतील काही निर्मात्यांना सांगते की, मला मराठी सिनेमात काम करायचं आहे. पण मला आशा आहे की मला अशी कुठली तरी स्क्रिप्ट मिळेल ज्यामध्ये आपल्या संस्कृतीचं चित्रण केलेलं असेल. त्याबद्दल बोलताना श्रिया 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाचं उदाहरण देत म्हणाली, "मला अशा चित्रपटांमध्ये मला काम करायला आवडेल. त्यामध्ये कुठेतरी मला माझ्यातील कलागुणांना वाव देता येईल." असं म्हणत श्रियाने तिच्या भावना व्यक्त केल्या. 

 श्रिया मराठमोळी मुलगी असूनही तिने हिंदीमध्ये आपला डंका गाजवला आहे. श्रियाने 'एकुलती एक' या मराठी सिनेमातून पदार्पण केलं होतं. नंतर तिने शाहरुख खानच्या 'फॅन' सिनेमातून हिंदीत पदार्पण केलं. यानंतर श्रियाला हिंदी सीरिजच्या ऑफर्स मिळत गेल्या.

Web Title: actress shriya pilgaonkar reveals in interview about why she is not seen in marathi films know the reason