मित्र जवळीक साधत होता, माधुरी पवारने शक्कल लढवली, म्हणाली- "त्याने खांद्यावर हात टाकताच..."
By कोमल खांबे | Updated: January 25, 2025 13:24 IST2025-01-25T13:24:34+5:302025-01-25T13:24:50+5:30
"तो माझ्या बाजूला बसला, खांद्यावर हात टाकला आणि...", मित्र जवळीक साधतोय पाहून माधुरी पवारने लढवली शक्कल

मित्र जवळीक साधत होता, माधुरी पवारने शक्कल लढवली, म्हणाली- "त्याने खांद्यावर हात टाकताच..."
अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून सामान्य कुटुंबातून आलेल्या अभिनेत्री माधुरी पवारने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकांनी तिला प्रसिद्धी मिळवून दिली. उत्तम अभिनयाबरोबरच माधुरी एक उत्कृष्ट डान्सरही आहे. सिनेसृष्टीतील अभिनय करिअरमध्ये तिला काही प्रसंगांनाही सामोरं जावं लागलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माधुरीने असा एक प्रसंग सांगितला.
माधुरीने आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने शाळेत असताना एका स्पर्धेसाठी गेलेल्याचा प्रसंग सांगितला. यातून तिने कसा मार्ग काढला हेदेखील माधुरीने सांगितलं. ती म्हणाली, "आपल्या आजूबाजूला आपलं वाटणाऱ्या व्यक्ती असतात. आपल्याला वाटतं अरे हा माझा मित्र आहे. कोल्हापुरच्या पुढे कागल म्हणून एक गाव आहे. तिथे एक स्पर्धा होती. त्यावेळेस आईबाबांना काहीतरी काम होतं. एक XYZ व्यक्ती आहे. त्यावेळेस तोही परफॉर्म करायचा. तो म्हणाला की मग आम्ही दोघं जातो. मी तेव्हा टॉमबॉइश होते त्यामुळे मला वेगळा काही असा फरक वाटायचा नाही. त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे. त्याने मुद्दाम आपण लवकर निघू आणि लवकर पोहोचू असं सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे आपण आधी जाऊ. मग आम्ही निघालो".
"तिथे गेल्यानंतर आवरण्यासाठी आम्हाला एक रूम दिली गेली होती. एक मुलगी म्हणून तुम्हाला काही गोष्टी कळतातच. ती गोष्ट मला जाणवली. तेव्हा मी शाळेत होते. पण, तेव्हाही ती गोष्ट मी खूप सोप्या पद्धतीने हँडल केली. तो माझ्या जवळ येऊन बसला आणि त्याने माझ्या खांद्यावरती हात टाकला. मी इतकं छान भाषेत त्याला समजावलं. मला आजही आठवतंय की मी त्याला म्हटलं, अरे हात टाकल्यावर मला छान वाटतंय. मला असं खूप छान वाटतंय की खूप चांगला मनुष्य माझ्या बरोबर आहे. मला खूप भारी वाटतंय की तू माझा मित्र आहेस. त्याच्या मनात आलं की आपण हिच्याबद्दल खूप वाईट विचार करतोय आणि ही कशी विचार करतेय. समोरची व्यक्ती कितीही वाईट असू दे पण, जर तुम्ही त्याच्या मनात विश्वास जागृत करू शकत असाल. कारण, जन्मत: माणूस कुठलाच वाईट नसतो", असं माधुरी म्हणाली.