कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला! 'खुर्ची' चित्रपटात राकेश बापट दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 13:25 IST2023-11-16T13:24:29+5:302023-11-16T13:25:34+5:30
'खुर्ची' चित्रपटात अभिनेता राकेश बापटची एन्ट्री झाली आहे. सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या या लढाईत अभिनेता राकेश बापटची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.

कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला! 'खुर्ची' चित्रपटात राकेश बापट दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
राजकारणातील डावपेच आणि खुर्चीचं राजकारण यावर आधारित असलेला 'खुर्ची' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटात कोणते कलाकार असणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता या चित्रपटात अभिनेता राकेश बापटची एन्ट्री झाली आहे. सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या या लढाईत अभिनेता राकेश बापटची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.
'खुर्ची' या चित्रपटात राकेश आत्मनिर्भर, स्वबळाने आणि मुख्यत्वे बुद्धीचा वापर करून स्वतःचं विश्व निर्माण करणारा अशी व्यक्तिरेखा राकेश साकारताना दिसणार आहे. त्याला दमदार भूमिकेत पाहणं रंजक ठरणार आहे. आजवर राकेशने त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा राकेशमधील करारीपणा 'खुर्ची' या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खुर्चीसाठीची लढाई राकेश लढणार का? आणि चित्रपटातील सत्तेसाठीच्या या लढाईत राकेशला खुर्ची मिळणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत 'आराध्या मोशन फिल्म्स',’ आणि 'योग आशा फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. डॉ. अमित बैरागी आणि आतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलली आहे. तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रतिक वसंतराव पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे,आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घग, अभिनेत्री , प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.
'खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये येणार आहे. ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.