अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 09:30 AM2023-08-24T09:30:44+5:302023-08-24T09:31:46+5:30

त्यांना संस्कृत फ्रेंच जर्मन स्पॅनिश गुजराथी उर्दू इतक्या भाषा यायच्या.

actor girish oak s father passed away at the age of 93 shares emotional post | अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

googlenewsNext

अभिनेते डॉ गिरीश ओक (Girish Oak) यांच्या वडिलांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. रत्नाकर ओक यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गिरीश ओक यांच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.  नव्वदीनंतरही अतिशय निरोगी आणि आनंदी आयुष्य ते जगले असं म्हणत गिरीश ओक व्यक्त झाले आहेत.

काय आहे गिरीश ओक यांची पोस्ट

अभिनेते गिरीश ओक यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले, 'काल माझे बाबा ती. रत्नाकर दिनकर ओक ह्यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृध्दत्वामुळे निधन झालं. प्रत्येक मुलाचे/मुलीचे वडील हे त्याचे पहिले हिरो असतात तसेच तेही माझे होतेच. माझ्यात ज्या काही थोड्याफार तथाकथित बऱ्या सवयी गोष्टी आहेत त्या त्यांच्यामुळेच. ते इलेक्ट्रिकल इंजीनीअर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजीनीअर ह्या पदावर ते १९८९ साली निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नाही. ह्या व्यतिरिक्त त्यांना अनेक गोष्टी अवगत होत्या. त्यांना संस्कृत फ्रेंच जर्मन स्पॅनिश गुजराथी उर्दू इतक्या भाषा यायच्या. ते शिवण काम आणि स्वयंपाक उत्तम करायचे. कपड्यांना इस्त्री, सायकल, स्कूटर घड्याळं घरातल्या जवळ जवळ सगळ्याच उपयोगाच्या वस्तूंचं सर्विसींग दुरूस्ती तेच करायचे तेव्हा मी त्यांना असिस्ट करायचो त्यामुळे त्या गोष्टी मीही शिकलो.
माझी आई गंमतीनी म्हणायची ती,मी आणि बहीण ह्यांना नटबोल्ट नाहीत नाहीतर त्यांनी आम्हालाही उघडून आमचं सर्विसींग केलं असतं. अर्थात ते त्यांनी न उघडताच केलं.'

पुढे लिहितात, 'ते बासरी आणि माउथ ॲार्गन छान वाजवायचे ते त्यांनी मला शिकवायचा प्रयत्नही केला पण मीच कंटाळा केला. रोज नियमीत सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करणं मी त्यांच्यामुळेच शिकलो. अन्नाची पाण्याची विजेची नासाडी त्यांना अजिबात खपत नसे ह्या गोष्टींची किंमत मला त्यांच्यामुळेच कळली. काय काय आणि किती सांगू आखीर बाप बाप होता है और बेटा बेटा. बाबा तूम्ही खूप सकारात्मक व्यासंगी आनंदी आयुष्य जगलात. तुम्ही खूप शांत संयमी होतात आणि अगदी तसेच जातानाही तुम्ही आम्हाला कोणालाही त्रास न देता शांतपणे गेलात. मला आणि सौ. पल्लवीला शेवटी तुमची सेवा करता आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तुम्हाला सतत वेगवेगळ्या कामात व्यस्त असणं आवडायचं देव तुम्हाला तसंच व्यस्त ठेवो म्हणजे तुम्ही आनंदी रहाल.
ती. बाबा शिरसाष्टांग नमस्कार'

वडिलांच्या निधनानंतर गिरीश ओक यांना अनेक संदेश मिळाले. त्यातील एक अभिमानास्पद पत्रही त्यांनी पोस्ट केलं. गिरीश ओक यांनी वडिलांसाठी केलेली ही पोस्ट नक्कीच भावूक करणारी आहे.

Web Title: actor girish oak s father passed away at the age of 93 shares emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.