Abhanga Tukaram Trailer: भक्ती आणि शक्तीचा संगम, 'अभंग तुकाराम' सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:57 IST2025-10-28T12:53:45+5:302025-10-28T12:57:01+5:30
अभंग तुकाराम सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात संत तुकारामांच्या आयुष्याची वेगळी बाजू दिसतेय

Abhanga Tukaram Trailer: भक्ती आणि शक्तीचा संगम, 'अभंग तुकाराम' सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
गेल्या अनेक दिवसांपासून ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्याचा वेगळा पैलू या सिनेमातून उलगडण्यात येणार आहे. अशातच नुकतंच ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आणणारा ट्रेलर अल्पावधीत व्हायरल झाला आहे. अभिनेते योगेश सोमण या सिनेमात संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘अभंग तुकाराम’चा ट्रेलर
‘अभंग तुकाराम’च्या ट्रेलरमध्ये संत तुकाराम महाराजांचं आयुष्य दिसतं. इंद्रायणी नदीत तुकाराम महाराज गाथा बुडवतात तेव्हा त्यांची होणारी घुसमट आणि त्यांची पत्नी आवलीचा राग सर्वांना दिसतो. पुढे विठ्ठलाला जाब विचारणारे तुकाराम महाराज दिसतात. तुझ्या मूर्तीअगोदर तुझे दलाल कशाला? असा संतप्त सवाल ते परमेश्वराला करतात. यानंतर ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीचा प्रसंग दिसतो. भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम ‘अभंग तुकाराम’च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतो. योगेश सोमण, स्मिता शेवाळे, अजिंक्य राऊत, अजय पूरकर या कलाकारांचा दमदार अभिनय बघायला मिळतो.
सिनेमाच्या ट्रेलरच्या शेवटी संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठप्रवासाची झलक बघायला मिळतात. एकूणच हा ट्रेलर इतका सुंदर आहे की, अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतं. तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचं अत्यंत सुंदर सार दडलेलं आहे. हेच सार ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून आपल्या समोर मांडण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. हा सिनेमा ७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.