"फडणवीस काका, शिंदे काका, तुम्हाला साहेब म्हणू शकत नाही", अभिनेत्यानं व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:35 IST2025-08-07T15:35:06+5:302025-08-07T15:35:26+5:30

अभिनेत्याची महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका

Aastad Kale Questions Nitin Gadkari Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar Over Potholes Dark Bridges | "फडणवीस काका, शिंदे काका, तुम्हाला साहेब म्हणू शकत नाही", अभिनेत्यानं व्यक्त केला संताप

"फडणवीस काका, शिंदे काका, तुम्हाला साहेब म्हणू शकत नाही", अभिनेत्यानं व्यक्त केला संताप

छोट्या पडद्यासह मोठा पडदा आणि रंगभूमी गाजवणारा लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्याने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आस्ताद हा सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय असतो. अनेक सामाजिक घटनांवर तो मोकळेपणाने बोलताना दिसतो. आताही आस्तादनं एक मार्मिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून अभिनेत्यानं प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत.

आस्ताद काळेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये "जरा इथेही लक्ष द्या..." असं लिहून हा व्हिडीओ त्यानं नितिन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालय यांना टॅग केलाय. व्हिडीओमध्ये तो म्हणतो, "नमस्कार... याआधी मी घोडबंदर रोडच्या रमणीय खड्ड्यांबद्दल एक व्हिडीओ शेअर केला होता. आता मुंबईत शिरतानाची काही अप्रतिम दृश्ये दाखवू इच्छितो. नितीन गडकरी काका, देवेंद्र काका, एकनाथराव काका… मी तुम्हाला साहेब म्हणू शकत नाही, कारण एकतर तुम्ही जनतेचे सेवक आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, राज्य चालवण्यासाठी आणि त्यांच्या सोईसुविधांकडे लक्ष देण्यासाठी. त्यामुळे मी तुम्हाला वयाचा मान राखून काका म्हणणार आहे".

पुढे तो म्हणतो, "तर हे बघा... आता आपण शिरतोय मीरा-भाईंदर परिसरात. इथे उजवीकडे तुम्हाला जूनी एखाद्या किल्ल्याची भिंत वाटावी, असं बांधकाम दिसतंय. तो खरंतर एक फ्लायओव्हर बांधला जातोय. ज्याचं काम मी गेले अडीच महिने पाहतोय, अर्धवट काम करून ते बंद केलं आहे. आता पाऊसही सुरू झालाय आणि रस्त्याची अवस्था काही प्रमाणात तुम्हाला कळतचं असेल. खरी गंमत तर पुढे आहे.  इकडे विपरीत दिशेने वाहने येतात".

 


तो म्हणतो, "पुढे खरी जादू सुरू होते, ती बृहन्मुंबई महानगरपालिकेची. जिथे मीरा-भाईंदर ब्रिज संपतो, तिथून एक रस्ता जातो तो काशिमीरा ब्रिजजवळ. बरं इथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा फार सुंदर मोठा असा पुतळा आहे. खड्ड्यांच्या आसपास तो पुतळा आहे. महाराज हतबल होऊन त्यांच्याच महाराष्ट्राल्या राज्यकर्त्यांचा कारभार पाहत आहेत. काशिमीराच्या ब्रिजवर खड्डे तर आहेतच आणि या ब्रिजवरील एकही लाईट चालू नाही. म्हणजे आपल्या आयुष्यातला थरार पदोपदी आणि पावलोपावली किती वाढवायचा याची काळजी हे प्रशासन घेत आहे. मी मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो. रोज आम्हाला आमच्या आयुष्याची किंमत तुमच्यामुळे कळते. आम्ही स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून कमावलेल्या गाडीची, त्यात तुम्हालाही भरघोस टॅक्स दिल्याची किंमत आम्हाला पदोपदी कळते. ही अवस्था आहे. या ब्रिजवरचा एकही लाईट सुरू नाही", असं त्यानं मुंबई महानगरपालिकेवर उपरोधिक टोला लगावत म्हटलं.

शेवटी त्याने सर्वच राजकारण्यांना उद्देशून कडक शब्दांत म्हटलं, "नितीन गडकरी काका, देवेंद्र फडणवीस काका, एकनाथ शिंदे काका, अजित दादा पवार काका आणि महाराष्ट्र विधानसभेत बसलेल्या सर्वच २८८ काका-काकू, मामा-मावश्यांचे मी आभार मानतो. इतक्या सोयी-सुविधा तुम्ही दिल्या आहेत. त्यात गाडी चालवताना रेल्वेने प्रवास केल्याचा अनुभव मिळतोय.  कारण ब्रिजवरील प्रत्येक जॉईंट्सवर तुम्हाला एक हादरा बसतो.  पण, ब्रिज संपल्यानंतर मात्र लखलखाट दिसू लागतो. तर महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका, भारत सरकार या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद", असं त्यानं म्हटलं. आस्ताद काळेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नागरिकांकडूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Web Title: Aastad Kale Questions Nitin Gadkari Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar Over Potholes Dark Bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.