'आरपार' संपताच जोडपं थेट थिएटरच्या स्टेजवर गेलं आणि..., ललित प्रभाकरने केला व्हिडीओ शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:50 IST2025-09-15T12:49:50+5:302025-09-15T12:50:16+5:30
'आरपार' सिनेमा तरुणाईला किती वेड लावतोय याचा अनुभव देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

'आरपार' संपताच जोडपं थेट थिएटरच्या स्टेजवर गेलं आणि..., ललित प्रभाकरने केला व्हिडीओ शेअर
'आरपार' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे हे दोन्ही कलाकार यानिमित्ताने एकमेकांसोबत काम करत आहेत. 'आरपार' सिनेमा रिलीजआधीपासूनच चांगलाच चर्चेत होता. सिनेमा पाहण्यासाठी तरुणाईने थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दी केलेली दिसतेय. अशातच ललित प्रभाकरने 'आरपार' सिनेमासंबंधीचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत सिनेमा संपताच थिएटरमधील एका जोडप्याने स्टेजवर जाऊन केलेल्या एका कृतीने लक्ष वेधून घेतलंय.
'आरपार' संपताच थिएटरमधील जोडप्याने काय केलं
'आरपार' सिनेमा स्क्रीनिंग सुरु असतानाच थिएटरमधील एक तरुण - तरुणी आपल्या जागेवरुन उठले. तरुण आपल्या मैत्रिणीचा हात धरुन तिला स्टेजवर घेऊन गेला. पुढे त्या तरुणाने गुडघ्यावर बसून मैत्रिणीला प्रपोज केलं. या सरप्राईजने त्याच्या मैत्रिणीला चांगलंच आश्चर्य वाटलं आणि तिने त्याच्या प्रपोजला होकार दिला. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष करुन दोघांच्या या खास कृतीला प्रोत्साहन दिलं. अशाप्रकारे ललितने हा व्हिडीओ शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे.
ललितने हा व्हिडीओ शेअर करुन सांगितलंय की, ''अजून काय पाहिजे.. आरपार ची जादू.. कलाकार म्हणून लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्याचं आमचं स्वप्न असतं. आणि आज, सर्वांसमोर साकार होणारं प्रेम पाहण्याचा अनुभव काहीतरी वेगळाच होता. या सुंदर जोडप्याचं पुढचं आयुष्य आमच्या सिनेमाप्रमाणे जादुई होवो, ही सदिच्छा'', अशा शब्दात ललितने त्याचा आनंद व्यक्त केला आहे.
हृता आणि ललित या दोघांच्या 'आरपार' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. रोमँटिक कथा असलेल्या या सिनेमात ललित व ऋता यांची हटके केमिस्ट्री बघायला मिळत आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं', याचे वर्णन दर्शविणारा हा सिनेमा आहे. १२ सप्टेंबरला 'आरपार' सिनेमा रिलीज झाला आहे. रिलीजआधीपासूनच सिनेमा चर्चेत असल्याने प्रेक्षकांनी या सिनेमाला पसंती दिली आहे.