'चला हवा येऊ द्या'फेम सागर कारंडेवर आली लोकल ट्रेनने प्रवास करायची वेळ?; सेकंड क्लासमधील गर्दीतला फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:48 IST2022-04-06T13:47:23+5:302022-04-06T13:48:25+5:30
Sagar karande: अनेकदा ही कलाकार मंडळी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करण्यापेक्षा स्वत:च्या वाहनाने प्रवास करणं जास्त पसंत करतात. मात्र, या सगळ्याला अभिनेता सागर कारंडे अपवाद ठरला आहे.

'चला हवा येऊ द्या'फेम सागर कारंडेवर आली लोकल ट्रेनने प्रवास करायची वेळ?; सेकंड क्लासमधील गर्दीतला फोटो केला शेअर
झगमगत्या कलाविश्वात वावरणारे सेलिब्रिटी कायम त्यांच्या स्टारडम आणि लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. त्यामुळे हे सेलिब्रिटी कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. विशेष म्हणजे आपले आवडते चाहते कुठेही दिसले की चाहते त्यांच्यापाशी घोळका करतात. त्यामुळे अनेकदा ही कलाकार मंडळी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करण्यापेक्षा स्वत:च्या वाहनाने प्रवास करणं जास्त पसंत करतात. मात्र, या सगळ्याला अभिनेता सागर कारंडे अपवाद ठरला आहे. सध्या सोशल मीडियावर सागरचा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतानाचा फोटो व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सागर कारंडेने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तो रेल्वेने प्रवास करत असून खच्चाखच भरलेल्या गर्दीत उभा असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्याचा हा फोटो पाहिल्यावर सागरवर ही वेळ कशी काय आली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
दरम्यान, एका नाटकाच्या प्रयोगासाठी जाताना सागरने रेल्वेने प्रवास करायचा निर्णय घेतला. वेळ वाचावा यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत त्याने 'नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहचण्यासाठी लोकल ने प्रवास...', असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.