जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'ची तारीख जाहीर; 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:54 PM2022-08-17T18:54:06+5:302022-08-17T19:03:03+5:30

Godavari: या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी मुख्य भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार झळकले आहेत.

marathi actor Jitendra Joshi upcoming movie Godavari release date | जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'ची तारीख जाहीर; 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'ची तारीख जाहीर; 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता जितेंद्र जोशी (jitendra joshi) याच्या बहुचर्चित 'गोदावरी' (Godavari) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.  गोदावरी नदीच्या काठावर चित्रित करण्यात आलेल्या या विशेष व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीने दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांना त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहिली आहे.

जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित 'गोदावरी' हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी मुख्य भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार झळकले आहेत.

“जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं.  मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो. त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो, त्याचं असणं माझ्या अवतीभोवती हवं होतं. आणि, तेच शोधत असताना मी गोदावरीशी बोलू लागलो आणि तिथेच मला निशिकांत सापडला. आजही मला त्याची आठवण येत आहे,” असं जितेंद्र म्हणाला.

गोदावरी ही निशिकांतची (जितेंद्र जोशी) कथा आहे, एक असा माणूस जो आपल्या कुटुंबापासून दूर भटकला आहे, अस्तित्वहीन आयुष्य जगतो आहे, आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं त्याला गोदावरी नदीजवळ मिळतात ज्याचा त्याने इतकी वर्षं तिरस्कार केला.

दरम्यान, आत्तापर्यंत गोदावरी या चित्रपटाला अनेक भारतीय तसेच जागतिक पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. अलिकडेच, या चित्रपटाची २०२१ च्या भारतातील सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये निवड करण्यात आली. तसंच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे IFFI २०२१ मध्ये जितेंद्र जोशीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार जिंकला, तर निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये, निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि शमीन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर एवी प्रफुल्ल चंद्रा यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार मिळाला.

Web Title: marathi actor Jitendra Joshi upcoming movie Godavari release date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.