...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
By कोमल खांबे | Updated: April 29, 2025 15:58 IST2025-04-29T15:57:54+5:302025-04-29T15:58:20+5:30
किशोरी शहाणे यांचा लेक बॉबीदेखील लोकप्रिय स्टारकिड आहे. त्याच्या फिटनेस आणि मॉडेलिंगसाठी तो ओळखला जातो. पण, त्याच्या नावामागे चाहत्यांना कुतुहल होतं. आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत किशोरी शहाणेंनी लेकाच्या नावामागचा उलगडा केला.

...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या आणि अभिनयाने एक काळ गाजवणाऱ्या किशोरी शहाणे मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करणाऱ्या किशोरी शहाणे हिंदी मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसल्या. किशोरी शहाणे यांनी त्यांचा लेक बॉबीसह लोकमत फिल्मीच्या सेलिब्रिटी किड्स या शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी लेकाचं नाव बॉबी ठेवण्यामागचं कारण सांगितलं.
किशोरी शहाणे यांचा लेक बॉबीदेखील लोकप्रिय स्टारकिड आहे. त्याच्या फिटनेस आणि मॉडेलिंगसाठी तो ओळखला जातो. पण, त्याच्या नावामागे चाहत्यांना कुतुहल होतं. आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत किशोरी शहाणेंनी लेकाच्या नावामागचा उलगडा केला. त्या म्हणाल्या, "खरं तर तेव्हा खूप विचार केला होता. आमच्या कुटुंबात मी मराठी, माझा नवरा (दीपक) पंजाबी, सासू बंगाली, माझ्या भावजया सरदारनी...असं सगळं वेगवेगळं होतं. आमच्या घरात राष्ट्रीय एकात्मता होती. मग दीपकचं म्हणणं असं होतं की मुलगा असो किंवा मुलगी आपण एक कॉमन नाव आधीच ठरवून ठेवुया. असं नाव ज्यामुळे त्या बाळाचा धर्म कळणार नाही. जगभरात तो कुठेही फिरेल त्याला बॉबी म्हणून ओळखतील".
"बॉबी हे असं नाव आहे की तो हिंदू आहे की मुस्लीम, ख्रिश्चन आहे की सरदार हे कळत नाही. म्हणून आम्ही आधीच बॉबी हे नाव ठरवलं होतं. जे बाळ होईल त्याला बॉबी नाव ठेवायचं. एवढं सिंपल होतं. त्याला ग अक्षर आलं होतं. बारशाला कानामध्ये बॉबी आणि ग च कुठलंतरी एक नाव सांगितलं होतं. पण त्या नावाने आम्ही त्याला कधीच बोलवलं नाही. त्यामुळे बॉबी हे कायम बॉबीच राहिलं", असंही त्या पुढे म्हणाल्या.