'लागिरं झालं जी'मधून जयडी, मामीची अचानक एक्झिट... हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 16:47 IST2018-06-26T16:45:48+5:302018-06-26T16:47:49+5:30
झी मराठी वाहिनीवर सध्या फॉर्मात असलेल्या 'लागिरं झालं जी' या मालिकेत पडद्यावर सगळं गोड-गोड सुरू असलं, तरी पडद्यामागे थोडाशी कटुता निर्माण झाल्याचं समजतं.

'लागिरं झालं जी'मधून जयडी, मामीची अचानक एक्झिट... हे आहे कारण
मुंबई - झी मराठी वाहिनीवर सध्या फॉर्मात असलेल्या 'लागिरं झालं जी' या मालिकेत पडद्यावर सगळं गोड-गोड सुरू असलं, तरी पडद्यामागे थोडाशी कटुता निर्माण झाल्याचं समजतं. जयडीची भूमिका करणारी अभिनेत्री किरण ढाणे आणि मामीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री विद्या सावळे यांनी अचानक ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामागचं कारण मानधनातील तफावत असल्याचं सांगितलं जातंय.
प्रेमाच्या पायऱ्या चढत, वेगवेगळ्या अडचणींवर मात करत, सगळ्यांचे रुसवे-फुगवे दूर करत 'लागिरं झालं जी' या मालिकेतील नायक-नायिका, अर्थात अज्या आणि शीतली आता लगीनगाठीत बांधले गेले आहेत. सध्या मालिकेत वटपौर्णिमेची तयारीही सुरू झालीय. अज्याच्या आयुष्यासाठी, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून शीतली प्रार्थना करणार आहे आणि त्याचवेळी लष्कराकडून पत्र आलंय. इकडे ही प्रेमकहाणी पुढे-पुढे जात असताना पडद्यामागे वेगळाच 'एपिसोड' सुरू होता. त्याचा आता 'द एन्ड' झाला आहे.
'लागिरं झालं जी'मध्ये मामी आणि जयडी यांची भूमिकाही महत्त्वाची होती. या दोघी आणि राहुल्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत होते. काही वेळा तर हे त्रिकूट अज्या-शीतलीपेक्षाही भाव खाऊन जात होतं. परंतु, मान मिळत असतानाही त्या तुलनेत मानधन मिळत नसल्यानं जयडी आणि मामी नाराज होत्या. त्यांनी ही नाराजी व्यक्तही केली होती. पण, त्याचा काही उपयोग न झाल्यानं या जोडीनं मालिकेला राम-राम ठोकला आहे. त्यांची जागा नव्या कलाकारांनी घेतली असली, तरी या मामींच्या अभिनयात ती मजा नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.