सिनेसृष्टीवर शोककळा, वयाच्या १०० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:40 IST2025-10-27T13:36:20+5:302025-10-27T13:40:08+5:30
मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाल्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे

सिनेसृष्टीवर शोककळा, वयाच्या १०० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. हॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जून लॉकहार्ट (June Lockhart) यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले आहे. कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते सध्याच्या काळातील अनेक कलाकृतींमध्ये त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.
जून लॉकहार्ट यांचं कुटुंब सिनेसृष्टीशी संंबंधित होतं. त्यांचे वडील जीन लॉकहार्ट आणि आई कॅथलीन लॉकहार्ट हे दोघेही लोकप्रिय कलाकार होते. त्यामुळे लहानपणापासून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. १९३८ मध्ये 'अ ख्रिसमस कॅरोल' या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'लॉसी' आणि 'लॉस्ट इन स्पेस' या भूमिकांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
१९५० आणि १९६० च्या दशकात जून लॉकहार्ट टीव्हीच्या दुनियेतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. 'लॉसी' या लोकप्रिय मालिकेत त्यांनी साकारलेली रुथ मार्टिन ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. याशिवाय 'लॉस्ट इन स्पेस' या सायन्स फिक्शन मालिकेत त्यांनी एका धाडसी आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाची सहजता आणि आर्तता यामुळे त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या.
'वॅगन ट्रेन', 'गनस्मोक', 'शी-वुल्फ ऑफ लंडन' आणि 'रॉहाइड' यांसारख्या अनेक प्रसिद्ध टीव्ही शोजमध्येही त्यांनी काम केले. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जून या शेवटच्या दिवसांपर्यंत खूप आनंदी आणि उत्साही होत्या. त्यांच्या निधनाने हॉलीवूडमधील एका युगाचा अंत झाल्याची भावना चाहत्यांच्या मनात आहे.