मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी केली अटक, चाहत्यांना मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:29 IST2026-03-06T11:26:58+5:302026-03-06T11:29:04+5:30
प्रसिद्ध गायिका पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ब्रिटनीला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे.

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी केली अटक, चाहत्यांना मोठा धक्का
प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्स (Britney Spears) पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ब्रिटनीला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याच्या आरोपावरून पोलिसांनीअटक केली आहे. या घटनेमुळे पाश्चात्य संगीत विश्वात मोठी खळबळ उडाली असून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नेमकी घटना काय?
ब्रिटनी स्पीयर्स आपल्या कारमधून जात असताना पोलिसांनी तिला तपासणीसाठी रोखले होते. प्राथमिक तपासणीत ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आणि तिने वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे आढळले. यानंतर पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतले. ब्रिटनीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ब्रिटनीला एक रात्र तुरुंगात काढावी लागली.
अटकेनंतर ब्रिटनीला जामिनावर सोडण्यात आले असले, तरी तिला आता या प्रकरणाचा कायदेशीर सामना करावा लागणार आहे. या प्रकरणाची सुनावणी ४ मे रोजी निश्चित करण्यात आली असून, ब्रिटनीला वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. जर तिच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले, तर तिला दंड किंवा काही काळासाठी तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
ब्रिटनी आणि वाद
सोशल मीडियावर ब्रिटनीच्या समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तिचे काही चाहते तिच्या मानसिक आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत, तर काहींनी "कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही," असे म्हणत तिच्यावर टीका केली आहे. आता ४ मे रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, न्यायालय याप्रकरणी काय निर्णय घेते आणि ब्रिटनीला शिक्षा होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.