प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 10:18 IST2025-12-17T10:17:23+5:302025-12-17T10:18:50+5:30
लेकानेच केली आईवडिलांची निर्घृण हत्या?

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रॉब रेनर आणि त्यांची पत्नी मिशेल रेनर यांची घरातच निर्घृण हत्या झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता या प्रकरणाला नवीन वळण आलं आहे. त्यांच्ा ३२ वर्षीय मुलगा निक रेनरला अटक करण्यात आली आहे. लॉस एंजिलिस पोलिसांना निकवर संशय असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
'व्हेन हॅरी मेट सैली'चे दिग्दर्शक रॉब रेनर ७८ वर्षांचे होते. तर त्यांची पत्नी मिशेल सिंग रेनर ६८ वर्षांच्या होत्या. १४ डिसेंबर रोजी दोघंही त्यांच्या लॉस एंजिलिस येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर चाकू हल्ल्याच्या जखमा होत्या. तेव्हाच पोलिसांचा पहिला संशय त्यांच्या मुलावर आला होता. सध्या पोलिसांनी यावर टिप्पणी केलेली नाही. निक रेनरची चौकशी सुरु आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, निक आणि रॉब रेनर यांच्यात मतभेद होते. २०१५ मध्ये निकने वडिलांसोबत 'बीइंग चार्ली'मध्ये काम केलं होतं तेव्हा त्यांच्यातील संबंध थोडे सुधारले होते. निकने सिनेमाची पटकथा लिहिली होती तर रॉब यांनी दिग्दर्शन केलं होतं. आता निकनेच आईवडिलांची हत्या केली आहे की नाही हे चौकशीतून लवकरच समोर येईल.
रॉब रेनर हे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. १९७० साली पहिल्यांदा सिटकॉम 'ऑल इन द फॅमिली'मध्ये मायकल 'मीटहेड' स्वीटिकच्या भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली होती. यासाठी त्यांना दोन वेळा ग्रॅमी अवॉर्डही मिळाला. नंतर त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. 'व्हेन हॅरी मेट सैली'हा त्यांचा गाजलेला सिनेमा होता.