'होम अलोन'मधली आई गेली! प्रसिद्ध कॉमेडी स्टार अभिनेत्रीचं निधन, ऑनस्क्रीन लेक भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 11:05 IST2026-01-31T11:05:18+5:302026-01-31T11:05:49+5:30
'शीट्स क्रीक' या गाजलेल्या सीरिजमधली त्यांची भूमिका लोकप्रिय झाली होती. हॉलिवूडची सर्वात ग्रेट कॉमेडी स्टार हरपली

'होम अलोन'मधली आई गेली! प्रसिद्ध कॉमेडी स्टार अभिनेत्रीचं निधन, ऑनस्क्रीन लेक भावुक
हॉलिवूडची प्रसिद्ध कॉमेडी स्टार कॅथरिन ओहाराचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं आहे. काल शुक्रवारी ३० जानेवारी रोजी त्यांनी लॉस एंजिलिस येथील घरी अखेरचा श्वास घेतला. 'शीट्स क्रीक' ही त्यांची गाजलेली वेबसीरिज होती. तर 'होम अलोन' या सिनेमातही त्या झळकल्या होत्या. 'द लास्ट ऑफ अस'मध्ये त्यांना शेवटचं पाहिलं गेलं. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कैथरिन ओहारा यांच्या निधनाची बातमी समजताच हॉलिवूड मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. 'होम अलोन' या लोकप्रिय सिनेमात त्यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या मैकाले कल्किनने त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. 'आई...मला वाटलं आपल्याकडे अजून वेळ आहे...तुझ्या बाजूला खुर्चीवर बसून तुला अजुनही बरंच काही सांगायचं होतं. माझं तुझ्यावर प्रेम आहे.' कैथरिन यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुलं आहेत.
प्रसिद्ध अमेरिकन सीरिज 'द लास्ट ऑफ अस'च्या सीझन २ मध्ये कैथरिन शेवटच्या दिसल्या. त्यांचा कोस्टार अभिनेता पेड्रो पास्कलने त्यांच्या स्मरणार्थ पोस्ट केली आहे.
कैथरिन यांची सर्वात गाजलेली सीरिज 'शीट्स क्रीक'चे ६ सीझन आले होते. त्यात त्यांनी साकारलेली मॉयरा रोज ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. यासाठी त्यांनी एमी अवॉर्डही मिळाला होता. त्यांचा १९८८ साली आलेला 'बीटलज्युस' सिनेमाही आयकॉनिक ठरला होता. १९७० साली कैथरिन यांनी 'सेकंड सिटी'या कॉमेडी प्रोजेक्टमधून करिअरला सुरुवात केली होती.