शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:10 IST2025-06-03T11:09:22+5:302025-06-03T11:10:00+5:30

५९ वर्षीय अभिनेत्याच्या मृत्यूने सिनेसृष्टी हळहळली

hollywood actor jonathan joss shot dead by neighbor over some dispute | शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू

शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू

प्रसिद्ध अभिनेता जोनाथन जोसची (Jonathan Joss) गोळी झाड़ून हत्या करण्यात आली आहे.  जोनाथन हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता होता. 'किंग ऑफ द हिल' मध्ये त्याने रेडकॉर्नला आवाज दिला होता. अमेरिकेतील सॅन एंटोनियो शहरात तो राहत होता. घरीच त्याची गोळी झाडून हत्या झाल्याने हॉलिवूड मनोरंजनसृष्टी हादरली आहे. 

५९ वर्षीय अभिनेता जोनाथन जोसचं काल रविवारी संध्याकाळी शेजाऱ्यांसोबत भांडण झालं. हा वाद इतका वाढला की आरोपीने त्याच्यावर रागात थेट गोळीबारच केला. जोनाथनला दोन  पेक्षा जास्त गोळ्या लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचं नाव सिगफ्रेडो अल्वारेज सेगा आहे जो ३७ वर्षांचा आहे. जोनाथनची हत्या केल्यानंतर त्याने कारमध्ये बसून पळ काढला. मात्र काहीच दूर गेल्यानंतर त्याला पोलिसांना पकडलं. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्याला १ कोटी ७० लाखा डॉलरच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात येऊ शकतो. 

जोनाथनवर गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी वैद्यकीय सेवा पोहोचली. मात्र त्याला अनेक गोळ्या लागल्याने तो तेव्हाच मृत पावला होता. इतर शेजारील लोकांच्या सांगण्यांनुसार, दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होता. मात्र हत्या करण्याइतकं काय घडलं यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही. 

जोनाथन जोसचं हॉलिवूडमधील करिअर चांगलं राहिलं आहे. त्याने 'किंग ऑफ द हिल' च्या दुसऱ्या सीझनपासून ते तेराव्या सीझनपर्यंत जॉन रेडकॉर्नला आवाज दिला. यातून त्याने अमेरिकेन आवाजाला स्क्रीनवर योग्य पद्धतीने सादर केलं. याशिवाय तो 'पार्क्स अँड रिक्रिएशन' मध्ये चीफ केन होटेटच्या भूमिकेत दिसला. तसंच 'टुल्सा किंग','रे डोनोवन','ट्रू ग्रिट','द मॅग्नीफिसंट सेवन' सारख्या सिनेमा आणि शोमध्ये तो दिसला. त्याच्या निधनानंतर हॉलिवूड कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

Web Title: hollywood actor jonathan joss shot dead by neighbor over some dispute