वाहतुकीचा हा नियम मोडला! अभिनेत्रीला बसला १ लाख दंड अन् सहा महिने ड्रायव्हिंगवर बंदी, असं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:08 IST2025-07-17T13:56:33+5:302025-07-17T14:08:02+5:30
Harry Potter fame Emma Watson : गाडी चालवताय तर हे वाचाच. अभिनेत्रीने केलेल्या एका चुकीमुळे तिला तब्बल १ लाखांहून अधिकचा दंड बसला आहे. तिच्या ड्रायव्हिंगवर सहा महिने बंदीही आली आहे.

वाहतुकीचा हा नियम मोडला! अभिनेत्रीला बसला १ लाख दंड अन् सहा महिने ड्रायव्हिंगवर बंदी, असं काय घडलं?
तुम्ही गाडी चालवता तर जास्तीतजास्त हजार रुपयांच्या घरात तुम्हाला दंड बसतो. पण एका अभिनेत्रीला भरधाव गाडी चालवल्याने तब्बल १ लाखांहून जास्त दंड बसला आहे. ही अभिनेत्री आहे ‘हॅरी पॉटर’ सिनेमातील इमा वॉटसन. हरमायनी ग्रेंजरच्या भूमिकेमुळे जगभर प्रसिद्ध झालेली ब्रिटिश अभिनेत्री इमा वॉटसन (Emma Watson) सध्या एका वाहतूक नियमभंगामुळे चर्चेत आली आहे. ऑक्सफर्डजवळच्या रस्त्यावर वेगमर्यादा ओलांडल्यामुळे तिच्यावर सहा महिन्यांसाठी वाहन चालवण्याची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय इतका मोठा दंड आकारण्यात आला आहे.
इमा वॉटसनने बसला १ लाखांचा दंड, असं काय घडलं?
ही घटना ३१ मे २०२४ रोजी घडली होती, जेव्हा इमा वॉटसन ३० किमी प्रतितास मर्यादेच्या रस्त्यावर ३८ किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत होती. ही बाब ट्रॅफिक कॅमेऱ्याद्वारे नोंदवली गेली आणि त्यानंतर तिच्यावर कारवाई झाली. विशेष म्हणजे, आधीपासूनच इमाच्या वाहन परवान्यावर ९ दंड समाविष्ट होते. आता या उल्लंघनासाठी आणखी ३ दंड वाढल्यामुळे नियमानुसार तिच्यावर सहा महिन्यांची ड्रायव्हिंगची बंदी लादण्यात आली आहे. याशिवाय कोर्टाने तिला सुमारे १.२ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून ही सुनावणी मॅजिस्ट्रेट कोर्टात सुरु होती, मात्र इमा स्वतः कोर्टात उपस्थित नव्हती. तिच्या वकिलामार्फत तिने सर्व दंड स्वीकारला आणि भरला. इमा वॉटसन (Emma Watson) सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ती काही काळ अभिनयापासून दूर असून, वैयक्तिक आयुष्य आणि शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत आहे. मात्र या घटनेमुळे तिला आता संपूर्णपणे सार्वजनिक वाहतूकीवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना सावधान, एक छोटीशी चूक तुमचं आर्थिक नुकसान करु शकते, हेच यातून दिसतं.