चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 09:05 IST2025-08-24T09:03:59+5:302025-08-24T09:05:18+5:30
वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध कलाकाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे

चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आलीय. 'एमिली इन पॅरिस' या वेबसीरिजच्या पाचव्या सीझनच्या शूटिंगदरम्यान एक दुःखद घटना घडली. सीरिजचे सहाय्यक दिग्दर्शक डिएगो बोरेला यांचे अचानक निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. डिएगो यांना सेटवरच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे 'एमिली इन पॅरिस' वेबसीरिजचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांना चांगलाच धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, डिएगो बोरेला हे इटलीमधील व्हेनिस येथे हॉटेल डॅनिएली येथे वेबसीरिजच्या काही अंतिम दृश्याची तयारी करत होते, तेव्हा अचानक ते कोसळले. तिथे उपस्थित वैद्यकीय टीमने त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. काही काळानंतर स्थानिक डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट केले. काहीच दिवसांपूर्वी 'एमिली इन पॅरिस' वेबसीरिजच्या पाचव्या सीझनचा फर्स्ट लूक आला होता. अशातच ही दुःखद घटना घडल्याने शूटिंगला गालबोट लागलं आहे.
ही दुःखद बातमी कळताच 'एमिली इन पॅरिस' वेबसीरिजच्या शूटिंगचे काम तात्काळ थांबवण्यात आले. 'एमिली इन पॅरिस'च्या संपूर्ण टीमसाठी ही घटना खूप धक्कादायक होती. बोरेला यांच्या निधनामुळे वेब सीरिजच्या कलाकारांनी आणि क्रू मेंबर्सनी शोक व्यक्त केला आहे. डिएगो बोरेला हे एक अनुभवी सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यांच्या निधनाने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.