कॅन्सरशी झुंज हरली! प्रसिद्ध गायकाचं वयाच्या ४७ व्या वर्षी निधन, संगीतविश्वावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 13:13 IST2026-02-08T13:08:58+5:302026-02-08T13:13:22+5:30
संगीत विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायकाचं वयाच्या ४७ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं आहे

कॅन्सरशी झुंज हरली! प्रसिद्ध गायकाचं वयाच्या ४७ व्या वर्षी निधन, संगीतविश्वावर शोककळा
संगीत विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन रॉक बँड '३ डोअर्स डाउन'चे (3 Doors Down) मुख्य गायक ब्रॅड अरनॉल्ड (Brad Arnold) यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून ते किडनीच्या कर्करोगाशी (Kidney Cancer) झुंज देत होते, मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली.
जागतिक संगीत क्षेत्रावर शोककळा
ब्रॅड अरनॉल्ड यांनी आपल्या आवाजाने जगभरातील कोट्यवधी चाहत्यांना वेड लावले होते. त्यांच्या निधनामुळे रॉक म्युझिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच जगभरातील संगीतप्रेमी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ब्रॅड अरनॉल्ड यांना किडनीचा कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी अत्यंत धैर्याने या आजाराचा सामना केला. या कठीण काळातही ते आपल्या संगीताशी आणि चाहत्यांशी जोडलेले होते.
This one is heartbreaking.
— Digital Daisy (@DigitalDaisyX) February 7, 2026
Brad Arnold, founder and longtime frontman of 3 Doors Down, has died at just 47. He passed away in his sleep after a battle with cancer. pic.twitter.com/ZycPTgWpsN
'३ डोअर्स डाउन' आणि लोकप्रिय गाणी
ब्रॅड अरनॉल्ड यांनी १९९६ मध्ये आपल्या मित्रांसह '३ डोअर्स डाउन' या बँडची स्थापना केली होती. या बँडचे 'Kryptonite' हे गाणे जागतिक स्तरावर प्रचंड गाजले आणि त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. याशिवाय 'Here Without You', 'When I'm Gone' आणि 'It's Not My Time' यांसारख्या अनेक सुपरहीट गाण्यांमुळे ते रॉक म्युझिकचे आयकॉन बनले होते.
अरनॉल्ड यांच्या जाण्याने त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. केवळ ४७ वर्षांचे असताना त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या गाण्यांच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील, अशा भावना त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.