प्रसिद्ध गायिकेचं ४७व्या वर्षी निधन, घरातच आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 18:36 IST2024-04-20T18:36:26+5:302024-04-20T18:36:52+5:30
राहत्या घरातच गायिकेचा मृतदेह आढळला असून तिच्या मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

प्रसिद्ध गायिकेचं ४७व्या वर्षी निधन, घरातच आढळला मृतदेह
प्रसिद्ध अमेरिकन गायिका मंडिसा हिचा ४७व्या वर्षी मृत्यू झाला आहे. मंडिसाच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवरून तिच्या निधनाच्या बातमीचं वृत्त देण्यात आलं आहे. राहत्या घरातच मंडिसा मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. तिच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.
मंडिसाच्या इन्स्टाग्रामवरुन तिच्या निधनाची बातमी देण्यात आली. “मंडिसा काल तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूमागचं कारण किंवा याविषयी इतर माहिती सध्या आमच्याकडे नाही. या कठीण काळात तिच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या मित्रांसाठी प्रार्थना करा. मंडिसा ही आव्हानांना तोंड देणाऱ्या लोकांसाठी प्रोत्साहन आणि सत्याचा आवाज होती,” असं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
मंडिसा तिच्या आवाजासाठी ओळखली जायची. तिने गायलेली अनेक गाणी सुपरहिट ठरली होती. २००६ मध्ये अमेरिकन आयडॉलमध्ये ती सहभागी झाली होती. या शोमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. २००७ मध्ये तिने ‘ट्रू ब्युटी’ नावाचा म्युझिक अल्बम रिलीज केला. हा तिचा पहिला अल्बम होता. गायनासाठी आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी मंडिसाला ग्रॅमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं.