गश्मीर महाजनीची प्रविण तरडेंसोबत मैत्री कशी झाली माहितीये का? अभिनेत्याच्या आईने तर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 14:30 IST2023-07-30T14:29:31+5:302023-07-30T14:30:19+5:30
रवींद्र महाजनी यांच्या अंत्यदर्शनासाठी मराठीतील अगदी मोजकेच कलाकार उपस्थित होते. अभिनेते प्रविण तरडे सुरुवातीपासूनच गश्मीरसोबत होते.

गश्मीर महाजनीची प्रविण तरडेंसोबत मैत्री कशी झाली माहितीये का? अभिनेत्याच्या आईने तर....
अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) मराठीतील सर्वात हँडसम आणि आघाडीचा अभिनेता. मराठीतील एकेकाळचे हँडसम डॅशिंग अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचा तो मुलगा. अगदी वडिलांसारखाच देखणा. नुकतंच रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आणि सर्वांनाच धक्का बसला. तळेगाव येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि दोन दिवसांनंतर घटना उघडकीस आली. रवींद्र महाजनी यांच्या अंत्यदर्शनासाठी मराठीतील अगदी मोजकेच कलाकार उपस्थित होते. तर यावेळी अभिनेते प्रविण तरडे (Pravin Tarde) सुरुवातीपासूनच गश्मीरसोबत होते. पण गश्मीर आणि प्रविण तरडे यांची मैत्री नेमकी कधीपासूनची आहे माहितीए का?
गश्मीरच्या करिअरची सुरुवात पुण्यातून झाली. गश्मीर लहानपणासूनच डान्समध्ये हुशार होता. पण त्याला लेखन आणि दिग्दर्शनातही रस होता. याचवेळी गश्मीरची प्रविण तरडे यांच्याशी ओळख झाली होती. तेव्हा प्रविण नाटक एकांकिका लिहायचे आणि दिग्दर्शनही करायचे. त्यातील काही नाटकांमध्ये गश्मीरने अभिनय केला. एकदा गश्मीरच्या आईने त्याच्या करिअरबाबतीत प्रविण तरडेंकडे चिंता व्यक्त केली होती. तर गश्मीरनेही एका मुलाखतीत सांगितलं होतं की प्रविणच्या येण्यानेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तसंच त्याने माझ्याकडे पाहूनच देऊळ बंद सिनेमातील राघव शास्त्रीची भूमिका लिहिली होती. देऊळ बंदचं लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडेंनीच केलं होतं. मागच्याच वर्षी आलेल्या प्रविण तरडेंच्या सरसेनापती हंबीरराव सिनेमातही गश्मीरने दुहेरी भूमिका साकारली होती.
गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी यांचं ११ जुलै रोजी निधन झालं. यावेळी प्रविण तरडेंना गश्मीरसोबत पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. मात्र गश्मीर अन् प्रविण तरडेंची मैत्री ही खरं तर जुनी आहे. त्यामुळे दोघंही सुखदु:खाच्या काळात एकमेकांच्या बरोबरीने उभे असतात हे दिसून आलं.